पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ९ व्यक्तिविषयक भाग ९ उपसंहार १ लो. टिळक यांच्या चरित्रातील मुख्य गोष्टी व हकीकती येथवर क्रमशः आम्ही सांगितल्या. व प्रसंगोपात्त निरनिराळ्या प्रश्नासंबंधाने त्यांच्या धोरणाचे वर्णन होताहोईतो त्यांच्याच शब्दानी दिले. तथापि टिळक ही व्यक्ति, त्यांचे कुटुंब व संसार, त्यांचे स्नेही सोबती व अनुयायी, आणि सामाजिक व धार्मिक बाबतीतील त्यांचे आचरण व धोरण यासंबंधाने दोन शब्द लिहून हा ग्रंथ पुरा करितो. पाच वर्षापूर्वी या ग्रंथाचा पूर्वार्ध लिहिला तेव्हा तो अपूर्ण व टिळकांच्या पूर्व वयाच्या कारकीर्दीचा म्हणून अशा प्रकारचे विवेचन त्यात करिता आले नाही. दुसरे पक्षी आता ते करण्याचे काम इतर रीतीने काहीसे अनवश्यकहि झाले आहे. कारण दरम्यान श्री. सदाशिव विनायक बापट यानी टिळकांच्या आठवणी व आख्यायिका' यांचे दोन खंड एकंदर सुमारे सातशे पानांचे प्रसिद्ध केले असून त्यात शेदोनशे गृहस्थानी टिळकाविषयी सांगण्यासारख्या व लक्षात ठेवण्यासारख्या शेकडो गोष्टी स्मरणपूर्वक सांगितल्या आहेत. अशा स्मरणकथनात टिळकांची व्यक्ति त्यांचा स्वभाव त्यांचे गुण त्यांची कार्ये त्यांची कार्य करण्याची पद्धति व महत्त्वाच्या विषयावरील त्यांची मते यावर अनेक बाजूनी उत्कृष्ट प्रकाश पडलेला आहे. यामुळे त्यांत टिळकांचे चित्र जितके ढळढळीत मनोवेधक व हृदय- स्पर्शी उमटले आहे तितके कोणाहि एका चरित्रकाराच्या हाताने, तो कितीहि कुशल असला तरी, उठविता येणे शक्यच नाही. म्हणून हा उपसंहार लिहिताना एरव्ही आम्हाला जितके लिहावे लागले असते व लिहिता आले असते तितके लिहिण्याचे कारण आता उरले नाही. आमचे काम आठवणी लिहिणाऱ्या शेकडो टिळकभक्तानी परस्पर पुष्कळच केले आहे. तथापि कोणीहि देऊळ बांधले तर त्याचे लहानसे का होईना शिखरही बांधलेच पाहिजे. म्हणून आमच्या या चरित्र ग्रंथाला या दृष्टीचे अपूर्णत्व राहू नये येवढ्याच करिता प्रस्तुत प्रकरण लिहित आहो. ( १ ) व्यक्तिविषयक व्यक्तिस्वरूप – टिळकांची कीर्ति सर्व हिंदुस्थानभरच काय पण इतर काही देशातहि पसरली होती. हिंदुस्थानातल्या रानाजंगलातल्याहि मनुष्यानी टिळकांचे नाव कर्णोपकर्णी ऐकले होते. आणि टिळक म्हटले म्हणजे कोणी तरी एक 'फार मोठा माणूस' इतकेच ज्ञान त्याना असे. देव भूत राक्षस यांचे वस्तु- रूप कोणीच पाहिलेले नाही. हे तीनहि आहेत किंवा असावेत अशी कबुली मन आंतून देते. पण या तिघांचेहि स्वरूप कोणी पाहिलेले नसते. त्यांची कल्पना मन करावयासच बसले तरी प्रत्येकाची वेगवेगळी होईल, किंबहुना त्याच एकाच