पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भोग ८ अत्याचारी लोक व टिळक १३ पेशवा गोरे लोकाना मेजवान्या देण्यात व बॉलमध्ये नाचण्यात दंग असे असें म्हणतात तोच प्रसंग पडल्याबरोबर बंडवाल्यांचा पुढारी झाला की नाही ? झांशीच्या राणीचाहि इतिहास पाहाल तर तिने इंग्रज सरकारकडे अर्ज करण्याकरिता जितकी लेखणी झिजवली तितकी काही धार येण्याकरिता १८५७पर्यंत तरवार घासली नव्हती. पण प्रसंग आला तेव्हा ती वीरा ठरली की नाही ? इतिहासातील पुष्कळ बंडांचे असेच असते. ती 'उद्भवतात.' तुम्हाला मी दैववादी असा वाटेन - पण त्याना साधनेहि तशीच आयत्या वेळी तयार होतात. पाण्याचे बर्फ होताना त्याची थंडी एकेक डिग्रीच्या क्रमाने कडेपर्यंत खाली येत नाही. तर काही एका मर्यादेला थंडपणा पोचल्याबरोबर व धक्का लागल्याबरोबर 'क्रिस्टलायझेशन' होते. ज्याना तुम्ही बंडे म्हणता त्यांचा प्रकार बहुधा असाच असतो. काय ? . पाहुणा - तर मग दैवावर हवाला ठेवून नुसती वाटच बघत बसावयाची टिळक-- मुळीच नाही. प्रत्यक्ष बंडाच्या बाबतीत मी दैववादी असलो तरी त्याची मला जी तयारी म्हणून वाटते त्या बाबतीत मी पक्का उद्योगवादी आहे. माझ्या मते हल्लीच्या स्थितीत कधी काळी जे बंड होईल किंवा न होईल त्याची तयारी म्हणजे आजच्या आज पिस्तुले आणवून ती तरुण लोकात वाहून देणे किंवा बॉंबचे कारखाने काढणे ही नव्हे, तर सार्वत्रिक व सामुदायिक असं- तोष उत्पन्न करणे ही होय. असंतोष हा शब्द सरकाराला वाईट लागो पण तो सर्वथा न्याय्य आहे. देशाच्या आजच्या स्थितीत आम्हाला असंतोष वाटू नये तर काय संतोष वाटावा ? पण तो असंतोष आजच्या घटकेला तरी काडी ओढून पेटविण्यासारखा नसावा तर पाणी तापवून हळूहळू ते अधिकाधिक उष्ण करण्या- सारखा असावा. काडी पेटविल्याने हात भाजेल व लागलीच तर कोठे थोडीशी आग लागेल. तिने कदाचित् डोळे दिपले तरी काम होणार नाही. आग न लागता व डोळे न दिपता पाणी अधण येण्यापर्यंत तापविता येते व त्यानेच पाकनिष्पत्ति होते. आजच्या बंडाची माझी कल्पना इतकीच आहे की देशातील शक्य तितक्या अधिक लोकानी सकारण रीतीने असंतुष्ट बनावे, आणि जो लहानसहान स्वार्थत्याग करावा लागेल तो करण्याला शिकून ज्या ज्या ठिकाणी परकी राज्याच्या देहाचा स्पर्श होईल तेथे तेथे त्याच्या शक्तीचा प्रतिकार करावा. व्यक्तिपराक्रमाने व्यक्ति- स्वभावाचे समाधान होते. उलट देशातील दहावीस लक्ष लोक लढाईला उमे राहण्याला एकदम सिद्ध होणार नाहीत व सिद्ध झाले तरी त्याना साधने एकदम मिळणार नाहीत. म्हणून पहिल्या पायऱ्या आपल्या स्वाधीन व शेवटची देवाच्या स्वाधीन असे समजून लोकाना असंतुष्ट धीट बाणेदार स्वाभिमानी व स्वार्थत्यागी होण्याला शिकविले पाहिजे. अशा गुणानी केलेल्या चळवळीत व्यक्तिपराक्रमाला जागा असते संधि सांपडते व पराक्रमाचे चीजहि होते. पण पुढे बंड करण्या- करिता आज अत्याचार शिकवावयाचे ही गोष्ट मला सयुक्तिक वाटत नाही.