पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/६००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ साधुसंत किंवा संन्यासी यांच्या विषयीच्या निंदेची वचने अशी काढून पाहिली तर ती फारच थोडी व सौम्यपणाची ठरतील. निदान इतके निश्चित म्हणता येईल की निवृत्तिमार्गी लोकानी प्रवृत्तिमार्गी संसारी लोक व व्यवहारी जग यांची जितकी तीव्र निंदा आपल्या ग्रंथांतून आजवर केलेली आहे तितकी टिळकानी केलेली ही निंदा खचित भरणार नाही. पहिल्या आक्षेपासंबंधाने शंकराचार्यांचे मत व स्वतःचे मत यात भेद किती सूक्ष्म आहे हे टिळकानी स्वतःच दाखविले आहे. गीतारहस्याचे अकरावे प्रकरण ' संन्यास व कर्मयोग' या विषयचे आहे. त्यात एक कोष्टक मांडून आयुष्य.. क्रमणाच्या मार्गाच्या प्रती व त्याना मिळणारी गति यांची फोड टिळकानी केली आहे. केवळ आत्मसुखासाठी कर्म करणे अधम प्रत, यथार्थ ज्ञान नसले तरी शास्त्राप्रमाणे काम्य कर्म करीत राहणे ही मध्यम प्रत. यथार्थ ज्ञान झाल्यावर वैराग्य बुद्धीने कर्मे सोडून देऊन केवळ ज्ञानाने तृप्त होऊन राहणे ही उत्तम प्रत. व यथार्थ ज्ञान झाल्यानंतरहि लोकसंग्रदार्थ शुद्ध बुद्धीने निष्काम कर्म करीत राहणे ही सर्वोत्तम प्रत. अशी टिळकानी वर्गवारी लाविली आहे. अर्थात् उत्तम व सर्वोत्तम या पदवीचाच काय तो झगडा आहे. या दोन्ही प्रतीना शेवटी मोक्ष ही एकच उत्तम गति मिळते हे टिळकाना नाकबूल नव्हते. आपल्या कर्मयोग्याला मोक्ष देण्यासाठी त्यानी संन्यासमार्गीयांचा मोक्ष काढून घेतला नाही. अर्थात् गतीच्या दृष्टीने नव्हे तर मनुष्यकर्तव्याच्या दृष्टीने ज्ञानोत्तर कर्म करण्याची 'शिफारस' किंवा 'सूचना' गीतेत आहे किंवा नाही इतकाच सूक्ष्म बाद उरतो. टिळकांच्या मते अशी शिफारस स्पष्ट दिसून येते. शंकराचार्यांच्याहि मताप्रमाणे ज्ञानोत्तर कर्म कोणी केले तर ते निषिद्धाचरण ठरत नाही. लोकसंग्रहार्थ कर्म करणे हे मनुष्यकर्तव्य असे एखाद्या ज्ञानी संन्याशाने म्हटले तर शंकराचार्यांच्या मतेहि त्याला अपवाद नाही. पण एखादा ज्ञानी संन्यासी है मनुष्य-कर्तव्य आहे असे न म्हणेल तर शंकराचार्याच्या मताप्रमाणे ते बरोबर ठरेल व टिळकांच्या मताप्रमाणे त्यात विचाराअंती दुरुस्ती करण्यासारखी काही जागा राहील. तात्पर्य न केले तर चूक नाही पण केले तर अधिक बरे इतका हा सूक्ष्म विवेक आहे. नुसता गीतेचा प्रसंग लक्षात घेऊनच जर टिळक मोघम म्हणते की ' गीता प्रवृत्तिकरिता सांगितली आहे ' तर त्याना कोणी नावे ठेवली नसती अशी सवलतद्दि संन्यास मार्गीयापैकी काहीनी आपल्या टीकेत सुचविली आहे. पण त्यांच्या मते टिळकांचे चुकले ते हे की आपला सिद्धांत सिद्ध करण्याच्या भरात त्यानी शंकराचार्यांच्या भाष्याला नावे ठेवली. एका बाजूला टिळकांचा जसा आग्रह तसाच शंकराचार्यांचा आग्रह दुसन्या बाजूला असल्याची हि कबुली पुष्कळानी दिली आहे. यामुळे टिळकांच्या बाजूला जो ऐन दोष शिल्लक उरतो तो आग्रहाशी आग्रह लढविताना शब्दार्थांच्या ओढाताणीचा. शंकराचार्यांनी जो दोष केला तोच टिळकानीहि केला.