पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० लो० टिळकांचे चरित्र भाग ७ प्रामाण्यबुद्धीमुळे "गीता हा ग्रंथ आमचेच मत प्रतिपादन करणारा आहे, आमचेच मत सहेतुक व निर्भेळ प्रतिपादन करणारा आहे", असा आग्रह धरिला हे होय. या आग्रहामुळे प्रत्येक सिद्धांतवादी आपल्या प्रतिपक्षावर नेमका तोच म्हणजे शब्दांची ओढाताण केल्याचा व अर्थ विपरीत लावल्याचा आक्षेप घेत असल्याचे दिसून येईल. आणि या बाबतीत टिळकानी जसा पूर्वीच्या टीकाकारांवर हा आक्षेप घेतला तसाच गीतारहस्याच्या टीकाकारांनी तो टिळकांवर घेतलेला आहे. आणि काही ठिकाणी तो लागूही पडतो. याचे कारण टिळक हे आधुनिक शास्त्र- संस्कृतीने युक्त असले तरी गीतेच्या बाबतीत त्यानी पुरातनांइतकीच प्रामाण्यबुद्धि ठेविली आहे. यामुळे इतरांप्रमाणे स्वतः टिळकानाहि गीतेचा अर्थ बसविताना नडणारे शब्द निरर्थक म्हणून गाळावे लागले आहेत. किंवा त्यांचा अर्थ विपरीत किंवा रूढीविरुद्ध करावा लागला आहे. किंवा जेथे त्यानेहि भागले नाही तेथे काही विशिष्ट शब्द किंवा विशिष्ट परिस्थिति किंवा विशिष्ट शंका-समाधान किंवा विशिष्ट हेतू गृहीत धरावा लागला आहे. यामुळे टिळकाना आपला सिद्धांत निःशंक किंवा निरपवाद रीतीने सिद्ध करता आलेला नाही. आता हे सर्व आक्षेप जमेस धरले तरी टिळकांची विद्वत्ता बहुश्रुतपणा कुशाग्रबुद्धि आणि समाजोप- कारित्व इतक्या गोष्टी गीतारहस्य ग्रंथात शिल्लक उरतात म्हणून निःपक्षपाती मनुष्य याच दृष्टीने या ग्रंथाची वाहवा करितो. पण एकंदरीने येवढी गोष्ट खरी की हा ग्रंथ लिहिल्याबद्दल टिळकांची कसून स्तुति करणारापेक्षा त्यांची कसून निंदा करणारे किंवा टीका करणारे लोकच अधिक निघाले. 'अस्फुट' रीतीने टिळकांचा या ग्रंथाबद्दल गौरव करणारे शेकडो किंवा हजारो लोक झाले व आहेत यात शंका नाही. किंबहुना सरसकट रीतीने असेहि म्हणता येईल की यच्चयावत नव्या पिढीला कोणत्याहि कारणाने का होईना पण गीतेचा प्रवृत्तिपर अर्थ लावणारा हा ग्रंथ मान्य व आदरणीय झाला आहे. पण हा बहुतेक करभार गुप्त दानाच्या स्वरूपाचा आहे. उलट ग्रंथासंबंधाने मत व्यक्त करण्याकरिता म्हणून ज्यानी शाईत लेखणी बुडविली अशांची गणति केली असता गीतारहस्यावर टीका करणारे किंवा आक्षेप घेणारेच लोक अधिक निघाले यात शंका नाही. याचे कारण ज्याचे पोट दुखेल तोच ओवा खाईल ही म्हण होय. ज्याना मान्यता दर्शवावयाची आदर प्रकट करावयाचा स्तुति करावयाची त्याना खोल पाण्यात शिरण्याचे कारणच नव्हते, त्यांच्या कार्याला काही सामान्य ठराविक शब्दच पुरे पडण्या- सारखे होते. पण या ग्रंथाने आपल्या जुन्या समजुतीना धक्का दिला असे ज्याना भासले त्यानाच खोल पाण्यात शिरावे लागले चर्चेची उठाठेव करावी लागली व मना- तला अभिप्राय कागदावर लिहिण्याचे श्रम करावे लागले. नाही म्हणण्याला रहस्यदीपिकाकार भिडे शास्त्री यांच्यासारखा एकादा जुन्या पद्धतीचा विद्वान किंवा चिंतामणराव वैद्य यांच्यासारखा नव्या पद्धतीचा विद्वान गीतारहस्याला