पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ हाच खरा लोकसंग्रह होय व तो निष्काम बुद्धीने करणे म्हणजे लोकोपकारहि निर- भिमान बुद्धीने करणे हेच मनुष्याचे इहलोकातील परम ध्येय होय. ही स्थिति प्राप्त होणे अत्यंत दुर्घट आहे खरे पण अभ्यासाने तीहि साध्य होते, असे गीतेचे सांगणे आहे. निष्कामबुद्धि किंवा फलाशात्याग याचा अर्थ बराच खोल असल्यामुळे त्याचाहि येथे थोडासा खुलासा केला पाहिजे. फलाशात्याग म्हणजे फलत्याग किंवा कर्माचे फळ मिळाले तरीहि ते सोडून देणे असा अर्थ नव्हे. गीतेला या जगातील जीवमात्राचे सर्व कर्म काढून टाकावयाचे नाही. जे सामान्यतः काम्य असते ते मात्र निष्काम करावयाचे आहे. कर्म सोडण्यास गीता कोठेच सांगत नाही. अर्थात् कर्म करण्याची इच्छा मनुष्यास असली पाहिजे इतकेच नव्हे तर त्या कर्मापासून पुढे काय परिणाम होण्याचा संभव आहे याचे त्यास ज्ञान असून तद- नुसार त्या कर्माची योजना करणेही मनुष्याचे काम आहे. एरवी त्याच्या सर्व क्रिया वेड्यासारख्या होतील म्हणून कर्म करण्याची इच्छा अगर हेतूचे ज्ञान किंवा योजना सोडून द्या असा फलाशात्याग या शब्दाचा अर्थ करता येत नाही किंबहुना या सर्व मनोवृत्ति मनुष्यास परिणामी दुःखकारक किंवा बंधकारक होऊ शकत नाहीत असे म्हटले तरी चालेल. दुःखाचे मूळ फलाच्या ठायी जी मनु- ष्याची ममत्वयुक्त आसक्ति असते त्यात आहे. कर्मात नाही. व कर्म करण्याच्या इच्छेत नाही. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदा च न ' या कर्मयोगाच्या गीतेतील चतुःसूत्रीचा अर्थ हाच होय. यासच इंग्रजीत Duty for duty's sake म्हणजे केवळ कर्तव्य म्हणून (कार्यमित्येव ) जे काय करावयाचे ते करावे असे म्हणतात. गीतेचा सर्व कटाक्ष याच तत्त्वावर आहे आणि असे करीत असता हत्येसारखी घोर क्रिया करावी लागली तरीहि त्याचा लेप कर्त्यास लागत नाही. उदाहरणार्थ भ्रूणहत्येसारखे दुसरे पाप नाही पण आडवे आले असता कापून काढणाऱ्या डॉक्टरास कोणी दोष देत नाही. परोपकारासाठी औषध देणाऱ्या डॉक्टरास रोगी बरा न झाल्यास त्याचे दुःख होत नाही हे याच तत्त्वाचे उदा- हरण होय. पण त्याच डॉक्टराचा मुलगा आजारी पडला असता त्याची बुद्धि कशी गुंग होते हे पाहिले म्हणजे निष्काम किंवा फलाशारहित कर्म कशाला म्हणावे हे ध्यानात येईल, बुद्धि फलाशारहित झाली म्हणजे कर्मच होणे शक्य नाही असे जे कित्येकांचे म्हणणे आहे त्यात काही अर्थ नाही. ज्यांची बुद्धि संसारात गुंतली आहे त्यास ही गोष्ट शक्य वाटत नाही म्हणून ती नाहीच म्हणणे म्हणजे आंधळ्यास सूर्य दिसत नाही म्हणून तो नाहीच म्हणण्यासारखे आहे. बुद्धि अशा प्रकारची निष्काम झाली म्हणजे त्या मनुष्यास 'पुष्कळ मनुष्यांच्या पुष्कळ कल्याणाकरिता प्रयत्न कर' असा उपदेश करण्याची जरूरच रहात नाही. मनुष्य म्हटला म्हणजे तो आपल्या कृत्याच्या बाह्य परिमाणाचा सारासार विचार करणारच एरवी तो मनुष्यच नव्हे. पण बाह्य परिणामाचा सारासार विचार करणे एवढेच काही सदाचरणाचे तत्त्व नाही कारण एखाद्या गरीबाने