पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७. गीतारहस्य २३ व्याख्यानांची पुस्तके लहान सुटसुटीत असल्यामुळे ती वाचावयास मिळणे हे इतके दुष्कर न व्हावे. पण मराठीत छापलेली टिळकांच्या व्याख्यानांची पुस्तके सरकार जमा असल्यामुळे पुष्कळशा ग्रंथसंग्रहालयातून त्यांचे उच्चाटन झाले व त्यांच्या हातोहात होणारा प्रसारहि थांबला. पण गीतारहस्य ग्रंथाची गोष्ट तशी नाही. खुद्द मराठी भाषेतील या ग्रंथाच्या तीन चार आवृत्त्या आजवर निघाल्या आहेत. व इतर देशी भाषांतूनहि त्याची भाषांतरे होऊन त्यापैकी कोणाची दुसरी तर कोणाची तिसरी आवृत्ति निघाली आहे. तात्पर्य जो ग्रंथ मराठी वाचकाना सहज सुलभ आहे त्याच्या विषयी पुष्कळशी माहिती देऊन आम्ही या पुस्तकाची जागा अडवू इच्छीत नाही. म्हणून ग्रंथ व ग्रंथकार यांच्यासंबंधाने जी अवांतर माहिती म्हणजे या ग्रंथात न मिळणारी माहिती तीच थोडीबहुत देणार आहो. ग्रंथाच्या प्रस्तावनेत टिळकानी आपला व भगवद्गीतेचा प्रथम परिचय केव्हा झाला व पुढे तो कसा वाढला याविषयी माहिती स्वतःच लिहिली आहे. प्रथम निर्विकार पठण किंबहुना निर्विचारपूर्वक पठण नंतर अर्थप्रतीतीचा प्रकाश. नंतर शंका व संशय. नंतर गीतेवरील टीका व भाष्ये यांचे अध्ययन. नंतर स्वतःच्या सिद्धांताची खात्री पटणे, व नंतर योग्य संधि मिळाल्याने स्वतःची टीका व भाष्य लिहिणे. अशा क्रमाने हा ग्रंथ निर्माण झाला. व वयाच्या १६ व्या वर्षांपासून ६० व्या वर्षांपर्यंत जर कोणत्याहि एका विषयाच्या परिशीलनाचे सूत्र टिळकांच्या अंतःकरणात अखंड गोवले गेले असेल तर तो हाच ग्रंथ होय. टिळकानी लिहिल्याप्रमाणे लहान वयात मनावर घडणारे संस्कार टिकाऊ असतात हे खरे. पण पुष्कळ वेळा शिक्षण व प्रौढपणातील अनुभव यांच्या योगाने बालपणातील संस्कार बदलूहि शकतात. ही गोष्ट लक्षात घेता गीता प्रवृत्तीपर आहे कर्मयोग- पर आहे हा सिद्धान्त इतक्या अल्पवयी त्याना पटला व इतक्या उतारवयापर्यंत तो दृढमूल होऊन राहिला - किंबहुना विशेष बलवत्तर होऊन त्याने सिद्धान्त ग्रंथाचे स्वरूप धारण केले ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. टिळकाना पट- लेला सिद्धान्त इतर कोणाला पटलेला नसेल असे नाही. पण टिळकांच्यासारखी साधने त्याना नव्हती असे म्हणा किंवा ते धैर्य प्रगट करण्याला अनुकूल अशी जी प्रतिष्ठेची व मान्यतेची भूमिका टिळकाना लाभली ती त्याना लाभलेली नव्हती म्हणून म्हणा. कोणत्याहि कारणाने असो. परंपरेच्या विरुद्ध जाऊन वादाच्या रणांगणात दण्ड थोपटून उभे राहण्याचे धैर्य टिळकानी केल्यामुळे, आपल्या मनाशी विचार करून पण भिऊन गांगरून राहिलेल्या लोकांचेद्दि कार्य त्यानी केले. टीका व भाष्ये ही एखादा ग्रंथ समजण्याला उपकारक असतात. पण अंधारातून बाहेर पडण्याकरिता म्हणून एखाद्याचा हात धरावा व त्याने आपल्या इच्छेप्रमाणे भलत्या मार्गाला न्यावे तशी गति टीका व भाष्ये वाचणारांची होते. पण टीका व भाष्ये बाजूला ठेऊन आधी मूळ ग्रंथ वाचून आपले मत बनविणे हीच टिळकांची अभ्यासपद्धति होती. व एल् एल् बी. च्या परिक्षेचा अभ्यास करिताना ती जशी दिसून