पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ खाल्डियन व भारतीय वेद असली तरी, घरी राहिलेल्या मुलाला पाजावयाचे अगर जेऊ घालावयाचे ही आकांक्षा जशी तिच्या मनात सदैव जागृत रहाते व कामाच्या धुमश्चक्रीत त्याची तिला मधून मधून आठवण होते, त्याप्रमाणेच कर्तव्य व अभिरुचि या दोहोंच्या कात्रीत सांपडलेल्या ग्रंथकाराची स्थिति असते. ग्रंथविषयक अपत्यप्रेम अगर वात्सल्य याविषयी प्रतिभासंपन्न विद्वान ग्रंथकार आणि गिरणीत मोलमजुरी करणारी स्त्री दोन्ही एकाच भूमिकेवर उभी असतात असे म्हणण्यास हरकत नाही. असो. चालू प्रकरणात मुख्य स्थान गीतारहस्य या ग्रंथालाच येत आहे. परंतु त्याविषयी लिहू लागण्यापूर्वी ज्या इतर दोनतीन प्रबंधांचा उल्लेख आम्ही वर केला आहे त्यांच्याशी हि वाचकांचा थोडा फार परिचय करून देणे योग्य आहे म्हणून प्रथम ते करितो, (२) खाल्डियन व भारतीय वेद या विषयावर टिळकानी पूर्वी १९०४ सालीच मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएश- नच्या दिवाणखान्यान व्याख्यान दिले होते. तो दिवस ६ डिसेंबर १९०४ हा होता. सभा 'पदवीधर संघाच्या विद्यमाने भरली होती. अध्यक्षाचे जागी पारशी पंडित के. आर. कामा हे होते. त्याच विषयावर पुढे १३ वर्षांनी भांडारकर स्मारक ग्रन्थाकरिता संपादकांच्या विनंतिवरून टिळकानी एक निबंध लिहिला. त्याचा थोडक्यात सारांश असाः- “१९ व्या शतकात एक मोठी गोष्ट घडली ती अशी की मेसोपोटेमियाच्या प्राचीन इष्टिका, म्हणजे मातीच्या भाजलेल्या विटा, यावर कोरलेले लिहिलेले अनेक लेख संशोधकाना सापडले. आणि युरोपियन पंडितानी मोठ्या चातुर्याने कल्पकतेने व परिश्रमाने ते लावून वाचले व त्यांची भाषांतरे केली. त्या लेखांवरून असे दिसते की ख्रिस्ती शकापूर्वी सुमारे पांच हजार वर्षे युफ्रेटीस नदीचे काठी तुराणियन वंशाचे लोक राहात होते. हे मूळ उत्तर आशियाखंडातून तिकडे गेले असावे. त्या लोकांच्या या लेखाना युरोपियन पंडितानी खाल्डियन लोकांचे वेद अशी संज्ञा दिली आहे व ती यथार्थहि आहे. या लोकांची संस्कृति व सुधारणा उत्तरेकडे पसरली व तिच्याशी हिंदुस्थानातील लोकांचा संबंध आसीरियन समाजाचे द्वारे आला. ते कसेहि असो. मी भारतीय वेदाचा काल सुमारे पांच हजार वर्षांइतका जुना ठरविला आहे व खाल्डियन लोकांच्या या वेदाचा कालहि युरोपियन पंडितानी तोच ठरविला आहे. या दोन समकालीन वेदांमध्ये म्हणजे वेद निर्माण करणाऱ्या लोकामध्ये समुद्र किंवा भूमि यांच्या द्वारे काही तरी दळणवळण असले पाहिजे व ते असल्याचा पुरावा वेदातील काही शब्दांवरून मिळतो. असा एक शब्द सिन्धू हा होय. प्रो. साईस यांच्या मताप्रमाणे बाबिलोनियन भाषेत सिन्धू या शब्दाचा अर्थ पातळ विणलेले वस्त्र असा आहे. आणि हिंदुस्थानातील सिन्धू नदीच्या द्वारे खाल्डियामध्ये ही वस्त्रे व्यापारी नेत असतील म्हणून त्या वस्त्राला लक्षणेने सिन्धू हाच शब्द लावण्यात