पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ लो० टिळकांचे चरित्र भाग ७ मंडाले येथे गीतारहस्याखेरीज त्यातल्यात्यात मोठा असा प्रबंध टिळकानी हाती घेतला तो वेदांग ज्योतिषाचा. पण तुरुंगात असता तो जितका लिहून झाला तितकाच तो पुढेहि राहिला. बाहेर आल्यावर तो त्यानी पुरा केला नाही. 'खाल्डिया व हिंदुस्थान' व 'अनुपलब्ध सांख्यकारिका' हे निबंध तुरुंगातून सुटून आल्यावर त्यानी लिहिले पण ते फारच लहान आहेत. ते प्रत्यक्ष लिहिण्याला त्याना चार- दोन दिवसापेक्षा अधिक वेळ लागला नसावा. सुटून आल्यावर त्यानी ग्रंथ- विषयक काम केले ते फक्त गीतारहस्यासंबंधी. पण हा ग्रंथ बहुतेक तुरुंगातच लिहून झाला होता. बाहेर आल्यावर टिळकानी मुख्यतः काम केले ते इतकेच की छपाईकरिता सर्व ग्रंथ नीट लिहून काढला. काही टीपा लिहिल्या. तुरुंगात असताना जे काही ग्रंथ संदर्भ हाताशी आले नव्हते ते हुडकून काढून तपासून जागच्या जागी नोंदवून घेतले, व हस्तलिखित प्रत निरनिराळ्या लोकाना वाचा- वयास देऊन किंवा तोंडाने मुद्दे सांगून त्यातील विषयांची चर्चा केली. टिळकानी १९०८चा खटला होण्यापूर्वी काम पुष्कळच केले. तथापि १९१४ साली सुटून आल्यावर त्यानी ते अधिक केले. व परिस्थितिहि अशीच होती की पूर्वीपेक्षा अधिक काम करणे त्याना आवश्यक झाले. हा आमचा तुलनात्मक सिद्धांत बरोबर आहे किंवा नाही हे प्रस्तुत चरित्रग्रंथातल्या पहिल्या खंडातील हकीकत व तिसऱ्या खंडातील हकीगत वाचणाऱ्याच्या लक्षात येइल. होमरूलची चळवळ काँग्रेसची चळवळ विलायतेतील चळवळ दौरे चिरोल केस इत्यादि कामे इतकी मोठी होती की त्यानी टिळकांच्या आयुष्याच्या शेवटच्या सहा वर्षातील बहुतेक सगळा वेळ खाल्ला. आणि मंडालेच्या तुरुंगात बसून त्यानी ज्या संकल्पित ग्रंथांची भली मोठी याद तयार केली त्यातील एखाद दुसरा ग्रंथ नवीन लिहिण्याचे क तडीस नेण्याच्या त्यांच्या आवडत्या कामाला वेळच मिळाला नाही. कामकरी व उद्योगप्रिय मनुष्याला कोणतेहि काम केले तरी तेच समाधान व तोच आनंद असतो ही गोष्ट एका अर्थी खरी. पण कामकरी मनुष्याची देखील स्वतःची हौस म्हणून काही असतेच. परेच्छेचे नियंत्रण काही नसता, परिस्थितीचा पाश मुळीच न पडता, केवळ स्वतंत्र इच्छेने व अभिरुचीने जर मनुष्याला काम करावयाला मिळेल तर प्रत्यक्ष तो जे काम करतो त्याहून एखादे वेगळे काम त्याने उचलले असते असे अनेक ठिकाणी आढळते. मनुष्याची आवड अभिरुचि हौस यांच्यावर वैयक्तिक धर्माचे किंवा राष्ट्रधर्माचे वर्चस्व पडून सार्वजनिक कर्तव्य म्हणून एखाद्या कामाला श्रेष्ठ प्रतीचा मान तो देईल. पण त्यावरून त्याची अभिरुचि किंवा आवड ही ठरत नाहीत. प्रोफेसर होऊन ग्रंथ लिहिणे व शिकविणे या कामाकडे टिळकांचे मन राजकारणाच्या ऐन गर्दीत एखादे वेळी जाई. व ते तिकडे गेले असे दिसण्यासारखा एखादा उद्गार त्यांच्या तोंडून निघे. यावरून वरील सिद्धांतच सिद्ध होतो. गिरणीतील मजुरी करणारी स्त्री आपल्या व आपल्या बाळाकरिता आवश्यक संसारकृत्य म्हणून गिरणी खात्यात कोठेहि काम करीत