पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/५३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ७ शास्ताविक ३ लिहून झाल्यावर तोच प्रबंध लिहावासा वाटला व यादीत नव्हता तरी तो लिहिला. उरलेल्या वेळात कदाचित यादीतील आणखी काही ग्रन्थ लिहून झाले असते. पण इतक्या ग्रन्थाना लागणारी साधने तुरुंगात कोठून मिळणार ? आधीच गीता- रहस्याकरिता व वेदांग ज्योतिषाकरिता मागविलेल्या ग्रंथांचा संग्रह शेकड्यानी मोजण्याइतका झाला होता. तेव्हा आणखी पुस्तके किती मागवणार ? वेदांग ज्योतिषाला लागणारी पुस्तके थोडी व तो विषय मनात तयार म्हणून गीता रहस्यानंतर टिळकानी तोच प्रबंध लिहून पुरा केला असावा असे वाटते. वरील यादीशिवाय लेखनविषयक अशा दोन संकल्यांचाहि उद्देश मंडाले येथील कागदोपत्रात व टिपणात उल्लेखिलेला आढळतो. एक संकल्प ओरायन ( अग्रहायन) किंवा वेदांचे प्राचीनत्व या ग्रंथाची दुसरी आवृत्ति तयार करण्या- विषयीचा व दुसरा संकल्प आर्याचे वसतिस्थान या ग्रंथाच्या सुधारून काढण्याच्या दुसऱ्या आवृत्तिविषयीचा. या प्रत्येक नव्या आवृत्तीला उपयोगी पडणारे ग्रंथ निबंध इत्यादिकांचे टिपण टिळकानी तपशीलवार केलेले आढळते. मंडालेहून परत आल्यावर दुसरे वर्षी १९१५ साली 'संस्कृतसंशोधन' नामक पुस्तकाकरिता "एक अनुपलब्ध सांख्यकारिका" या विषयावर टिळकानी एक निबंध इंग्रजीत लिहिला तोहि हल्ली छापून प्रसिद्ध झाला आहे. या विषयाचा उल्लेख वर दिलेल्या यादीत नाही. तथापि हा विषय मंडाले येथे असताना व तत्पूर्वीहि टिळकांच्या डोक्यात नव्हता असे म्हणवत नाही. कारण या विषयावर डॉ. गर्दे वगैरे लोकाशी त्यांची केव्हा केव्हा झालेली संभाषणे अनेकांच्या ऐकण्यात आहेत. असो. प्रस्तुत जे प्रकरण आम्ही लिहित आहो त्याशी वरील यादीचा संबंध केवळ प्रस्तावनात्मक आहे. त्या यादीवरून इतकाच अर्थ घ्यावयाचा की, आम्ही प्रारंभी म्हटल्याप्रमाणे, तुरुंगात रिकामा वेळ सापडल्यामुळे टिळकांच्या ग्रंथकर्तृत्वाची व प्रबंधरचनेची बुद्धि विशेष स्फुरण पावू लागली होती. किंबहुना किंचित् ग्राम्य शब्दाची योजना करून आम्ही असेहि म्हणू की उपवासग्रस्त मनु- ष्याला जसे हे खाऊ का ते खाऊ असे होऊन जाते त्याप्रमाणे रिकाम्या फुरसतीचा अवधि अवचित लाभलेल्या टिळकांच्या प्रतिमेला संशोधक बुद्धीला आणि प्रति- ष्टितप्रज्ञेला हे लिहू का ते लिहू असेच बहुधा झाले असावे. कोणाहि चांगल्या ग्रंथकाराची स्थिति अशीच असते की त्याच्या मनाने योजिलेले सर्व ग्रंथ लिहून होण्याइतके आयुष्यच त्याला लाभत नाही. आणि टिळकानी जरी तुरुंगातील रिकामेपणात बसल्या बसल्या संकल्पित ग्रंथांची लांबलचक माळ तयार केली असली तरी ती व्यर्थ होती हे त्यांचे त्यानाहि माहीतच होते. कारण तुरुंगात असे तोपर्यंत आवश्यक ती सर्व साधने मिळणारी नव्हती व तुरुंगातून सुटून बाहेर गेल्यावर इतर कामाचा व्याप सहजच इतका वाढणार की त्यात एखाद्या संकल्पित ग्रंथाकडे पहाण्याला वेळ मिळणे अशक्य.