पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ पर्स फंड-समर्पण-समारंभ ६० जातीजातीतील समान हक्कासंबंधाने जाहीरनाम्यात नमूद केलेली मते ढोंगीपणाची आहेत. पण अशा आक्षेपाला उत्तर देणे कठिण. ती मते चूक आहेत असे कोणी म्हणता तर गोष्ट वेगळी. पण मते बरोबर तरी ती ढोंगीपणाची असे म्हणणे म्हणजे जिला आधार नाही म्हणून जी खोडूनहि काढता येणार नाही अशीच ती टीका होय. पण हा जाहीरनामा नेमस्त पक्षाकरिता काढला नव्हता. राष्ट्रीयपक्षा- करिता काढला होता. आणि त्या पक्षाला तो पूर्णपणे मान्य होता. शिवाय में महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केळकर यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरी येथे भरलेल्या जिल्हासभेत व त्यानंतर खानदेश ठाणे वगैरे जिल्ह्यात केळकर यानी जो एक दौरा काढला त्यातहि ती गोष्ट सिद्ध झाली. रत्नागिरीच्या सभेला विरोध करण्याला नेमस्त व ब्राहाणेतर जाणार अशी वदंता होती. परंतु ते घडून आले नाही. डहाणू येथे एका गृहस्थाने जाऊन काही थोडी गडबड केली. पण परिषदेत त्याची डाळ मुळीच शिजली नाही. आणि बाहेर जो व्याख्यानप्रसंग झाला त्यातहि त्याला हार खावी लागली. (१६) पर्स फंड-समर्पण-समारंभ यानंतर राष्ट्रीयपक्षाने जमविलेला टिळकपर्सफंड समक्ष अर्पण करण्याचा समारंभ मे महिन्याच्या २२ व्या तारखेस पुण्यास झाला. डॉ. नानासाहेब देशमुख हे अध्यक्ष होते. फंड जमविण्याच्या कामी ज्या लोकानी मेहेनत घेतली होती त्यापैकी काही स्वतः व काही प्रतिनिधीद्वारा हजर होते. प्रथम केळकर यानी फंडाची मूळ कल्पना का व कशी निघाली तो जमविण्याची खटपट कशी झाली वगैरे हकिकत सांगितली. लहानसहान रकमानी हा फंड गोळा केला असा त्यावर एक आक्षेप होता. पण त्याचे उत्तर असे की मोठ्या रकमा लोकानी द्याव्या असा परस्पर हवाला देऊन स्वतः काही न करणारे असे लोक अनेक होते. आणि फंडाची रकम तर मोठी म्हणून सामान्य माणसालाहि यथाशक्ति मदत करण्याला सवड रहावी याकरिता कोणी ज्या दिल्या त्या रकमा घेतल्या गेल्या. व त्याकरिता मुद्दाम एक- रुपयापासून हजार रुपयापर्यंत तिकिटे काढली होती. फंडाच्या सुरवातीपासून तो पुरा जमण्याला सहा महिने लागले, पण इतक्या थोड्या अवधीत एवढी मोठी रक्कम आजपर्यंत कोणीहि कोणाकरिता महाराष्ट्रात जमविली नव्हती. नेमस्तपक्षाने या फंडाला काहीच दिले नाही व त्यांच्याकडे कोणी मागितलेहि नाही. तथापि पूर्वी टिळकांचे भक्त म्हणून मिरविलेल्या व पुढे त्यांच्यावर उलटलेल्या आपल्या- तीलच काही लोकानी असे आक्षेप घेतले होते म्हणून त्याना उत्तरे द्यावी लागली. नंतर अण्णासाहेब नेने यानी फंडाच्या हिशोबासंबंधाने सर्व हकीकत सांगितली. शेवटी टिळकांनीहि आभारप्रदर्शनाचे भाषण करताना वरील आक्षेपांना समर्पक उत्तरे दिली.