पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ सिंध प्रांतांतील दौरा ५२ उठून संमति दर्शविली असता दोघा ब्राह्मणेतरानी मात्र त्यास विरोध केला. उत्तर देताना टिळक म्हणाले " एक दोघा गृहस्थानी विरोध केला याबद्दल मला वाईट न वाटता उलट आनंदच झाला. कारण हे दिवस आता सर्व वर्गाच्या लोकानी पुढे येऊन आपले मत स्पष्ट मांडण्याचे आले आहेत. मात्र लोकानी सरकाराला विरोध करताना देखील ही निस्पृह बाणेदार वृत्ति ठेवावी म्हणजे आमचे आयते कामच झाले. " या प्रसंगी टिळकानी ब्राह्मण ब्राह्मणेतर या वादा- वर सुमारे दोन तास पर्यंत मोठे परिणामकारक भाषण केले. त्यात ते असे म्हणाले की " प्रत्येक मनुष्य कोणती तरी एखादीच चळवळ हाती घेऊन ती यशस्वी रीतीने चालवू शकतो. यामुळे मला सामाजिक चळवळीकडे लक्ष देण्याला फाव- तच नाही. " या मुक्कामात शेवटी जैनांच्यातर्फे एक व ब्राह्मणेतरातर्फे एक अशी दोन मानपत्रे टिळकाना देण्यात आली. अशा रीतीने टिळकाना करण्यात येणारा विरोध यशस्वी होत नव्हता हे खरे. तरी पण पुण्याच्या सभेतील एखाद्या मुलाप्रमाणे किंवा बेळगावच्या सभेतील एक दोन गृहस्थाप्रमाणे टिळकांच्या सामाजिक मतावर भरसभेत उभे राहून टीका कर- णारी माणसे निघू लागली होती. व याचा अर्थ द्वाच की काहीसे सामाजिक विचारात हळुहळु होणाऱ्या क्रांतीने आणि काहीसे नव्या मतदारीच्या मोहक दर्शनाने अशिक्षित अर्धशिक्षित अशा लोकाना व सरसकट ब्राह्मणेतर वर्गाला एक प्रकारचा नवा हुरूप आला होता यात शंका नाही. पण अशा रीतीने तुरळक होणारे हे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर व संघटित स्वरूपाने करण्याची एक संधि नेमस्त पुढा-याना लौकरच मिळाली व ती साधण्याचा त्यानी शक्य तितका प्रयत्न केला. ही संधि म्हणजे लौकरच सोलापूर येथे होऊ घातलेली मुंबई इलाख्यातील त्या सालची प्रांतिक परिषद. या परिषदेचे अध्यक्षस्थान केळकर याना देण्यात आले होते. टिळकहि अर्थात् हजर राहणार होते. कारण अमृतसरच्या राष्ट्रीय सभेतील बाद मुंबई इलाख्यापुरता तेथे निघणार व सर्व विरोधी वर्गाकडून संघ- टित प्रयत्न होणार हे आगाऊ उघड दिसून येत होते. (१३) टिळकांचा सिंध प्रांतातील दौरा पण या सभेला जाण्यापूर्वी टिळकाना आणखी एक लांबचा प्रवास उरकून घ्यावयाचा होता. ता. २ एप्रिल रोजी प्रांतिक परिषद भरणार होती. तिला हा मधला दौरा संपवून यावयाचे म्हणून टिळक पुण्याहून ता. १७ मार्चच्या सुमाराला निघाले. वाटेत मुंबई येथे हिंदमहिलासमाजापुढे "स्त्रिया व राष्ट्रकार्य : या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. तेथून ता. २० रोजी दिल्लीस जाण्याकरिता निघाले ते ता. २१ रोजी पोंचले. मोठी मिरवणूक निघाली हे सांगावयास नकोच. त्याच दिवशी मिरवणुकीनंतर जाहीर सभा भरून टिळकाना मानपत्र अर्पण करण्यात आले. नंतर दिल्ली येथील महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाजाने पाडव्याचा मुहूर्त