पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ तो काढून टाकून त्यानी पूर्ववत् आपले ध्येय कायम ठेवून व मिळाले तेवढे पदरात टाकून स्वराज्यप्राप्तीच्या पुढच्या उद्योगास एकीने लागावे. माँटेग्यू- अॅक्ट जरी पास झाला तरी तेवढ्याने काही सर्व काम झालेले नाही. अर्थात् अॅक्ट कितीहि बरा असला तरी त्यास हुरळून जाणे योग्य नाही. किंच- हुना आता जे प्रयत्न करावयाचे आहेत ते या अॅक्टावर संतुष्ट न राहता पूर्वी- पेक्षाहि अधिक उद्योगाने नेटाने व निश्चयाने केले पाहिजेत. आणि तेहि आम्ही जितक्या लवकर करावयास लागू तितक्या लवकर झाले पाहिजेत. जग पालटत चालले आहे, तोच त्याच्या प्रवाहात आम्ही आपले हात धुऊन घेतले पाहिजेत. 'नेमस्त पक्ष' हे बाईचे कायमचे वसतिस्थान होणे शक्य नाही. राष्ट्रीय पक्षासच त्याना येऊन मिळाले पाहिजे. त्यातच बाईचे राष्ट्रीय पक्षाचे व हिंदुस्थानचे कल्याण आहे. म्हणून मागील सर्व गोष्टी विसरून जाऊन निरहंकार बुद्धीने बाईंनी टिळकाशी म्हणजे राष्ट्रीय पक्षाशी अगर राष्ट्रीय सभेशी पूर्ववत् सहकारिता करावी, रुसून फुटून जाऊ नये अशी त्यास आम्ही विनंति करतो. ही गोष्ट जर शक्यच नसेल तर यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ । समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागमः ॥ ऋषिवाक्य लक्षात ठेवून खेद व हर्ष मनात न आणता ज्याने त्याने आपापल्या वाटेने जाणे जरूर आहे. राजकारणातील संयोग वा वियोग यांचा वरील श्लोकात वर्णन केलेल्या वेदांत दृष्टीने कर्मयोग्यानी विचार केला पाहिजे. (१०) अमृतसरची काँग्रेस ता. २७ डिसेंबर रोजी अमृतसर येथे राष्ट्रीय सभा भरण्याचे ठरले होते. ती सभा दोन कारणानी विशेष महत्त्वाची होती. पहिले असे की विलायतेतील कामगिरी आटोपून शिष्टमंडळे परत आली त्यातील लोक सभेला हजर राहणार होते. पण त्याहून महत्त्वाचे कारण हे की पंजाब प्रकरणावर सर्व राष्ट्राने मिळून मत प्रगट करण्याचा हाच पहिला प्रसंग होता. व शेपन्नास वर्षात न घडलेले असे दारुण प्रसंग या दुदैवी सालात अमृतसर येथेच घडले म्हणून पंजाबात काँग्रेस व्हावयाची ती लाहोरास न होता अमृतसर येथेच शक्य तर भरवावी हे औचित्याच्या दृष्टीने ठीकच होते. प्रथम अशी शंका आली की अमृतसर येथे एवढ्या सभेची व्यवस्था नीट कशी होईल ? पण उत्साहामुळे सर्व काही होते तसेच येथेहि घडून आले. विचान्या अमृतसरच्या लोकानी आपली सर्व दुःखे विसरून आपणात नवजीवन उत्पन्न झाले हे दाखविण्याकरिता सभेची सर्व व्यवस्था फार चांगली केली होती. या संकटात ज्या लोकानी पंजाबाला विशेष मदत केली त्यापैकीच एक म्हणजे पं० मोतिलाल नेहरू हे अध्यक्ष होणार होते. यामुळे या उत्साहात भर पडली होती. यंदाहि काँग्रेसकरिता मुंबईहून स्पेशल