पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ६ पुण्याचा स्वागतसमारंभ दादर येथील होमरूलर क्लबातर्फे मानपत्र तेथेच दिल्यावर टिळकानी उत्तरादाखल भाषण करून हिंदुस्थानातील आपल्या सर्व स्नेहीमंडळीचे व जनतेचे आभार मानले. व विलायतेत बॅपटिस्टा वगैरे ज्या लोकानी त्याना मदत केली त्यांचेहि आभार मानले. सुधारणासंबंधी त्यानी असे सांगितले की "आज बिलाने दिलेल्या सुधारणा थोड्या असल्या तरी आपल्याला निराश होण्याचे कारण नाही. मजूर- पक्षाने आमचे होमरूल बिल पार्लमेंटात आणण्याबद्दल आश्वासन दिले आहे. म्हणून बिल अपुरे असले तरी त्याचा त्याग करावा असे नाही. आज जे काही मिळेल तेवढे तर पदरात घ्याच पण तेवढ्याने संतुष्ट होऊन चळवळ सोडू नका. कारण ' संतोषो हरति श्रियम्' ही म्हणच आहे. इकडील हकीगती मला सर्व कळल्या. . रौलेट विला विरुद्ध गांधीनी सत्याग्रह सुरू केला तेव्हा त्यात भाग घेण्याला मी हजर नव्हतो एवढेच मला वाईट वाटते." ता. २८ रोजी सरदारगृहात टिळकाना मुंबई नॅशनल यूनियनने मोठी मेजवानी दिली. ता. २९ रोजी परळ येथील एका मैदानात मावजी गोविंदजी यांचे अध्यक्षतेखाली गिरणी कामगारानी टिळकाना मानपत्र दिले. त्याच दिवशी लॉ क्लासच्या विद्यार्थ्यांनी सरदार गृहात उपहार समारंभ केला. तसेच पैसाफंड स्वयंसेवक गोरक्षण संस्था ब्राह्मणसभा व खुद्द सरदार गृहसंस्था यानीहि आपापल्यापरीने टिळक व इतर गृहस्थ यांचा सत्कार केला. ( ७ ) पुण्याचा स्वागतसमारंभ ता. १ डिसेंबर रोजी टिळक पुण्याला परत आले. त्यांच्या सत्काराची व्यवस्था करण्याकरिता एक स्वागतमंडळ बनविण्यात आले होते. फिरून जाण्याच्या दिवसाप्रमाणे येण्याच्या दिवशी गावच्या लोकानी तोरणे कमानी वगैरे लावून शोभा आणली होती. मिरवणूकीला प्रो. देवल यानी आपले दोन हत्ती व घोडे दिले होते. रानडे कॉंट्रक्टर यांच्या मोटारीत बसून टिळक व मिरवणुकीतील लोक परत येत असता ठरलेल्या ठिकाणी लोक आगाऊ पानसुपाऱ्यांची तयारी करून जय्यत उभे राहिलेले होते तेथे थांबून पुढे जावे असे होता होता घरी येऊन पोहोचण्याला त्याना ११॥ वाजले. ब्राह्मणेतर मंडळी या प्रसंगी काही विरोधाची चुणूक दाखविणार अशी गुणगुण असल्यामुळे पोलिस अधिकारी व स्वयंसेवक यानी बंदोबस्त फार चांगला ठेवला होता. सार्वजनिक मानपत्राची सभा मंगळवार ता. २ डिसेंबर रोजी करण्याचा विचार होता. पण टिळकांचा आवाज बसलेला असून त्याना श्रमही झालेले होते म्हणून ती सभा ता. ७ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली. तथापि शहर म्युनिसिपालिटीकडून मानपत्र देणेची तारीख आल्या दिवसाचीच ठरलेली असल्यामुळे त्याच दिवशी तो समारंभ करावा लागला. हा समारंभ रे- मार्केटाच्या इमारतीच्या पण खालच्या पाकळ्यांच्या जागेत केला होता. यामुळे फारच खेचाखेच झाली. अध्यक्ष लक्ष्मण जनार्दन आपटे यानी टिळक व केळकर याना मानपत्रे वाचून अर्पण केल्यावर उभयतानी उत्तरादाखल भाषणें केली.