पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३ लो० टिळकांचे चरित्र भाग ६ ण्याचा प्रयत्न केला म्हणून गोळीबार करावा लागला असा धडधडीत खोटा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सभेतील लोकानी आपणास दटावल्याबद्दल स्वतः जन- रल डायर हंटर कमिटीपुढील साक्षीत एक अवाक्षरहि बोलत नाही ! हा जाहीर- नामा आणखी एकदोन मुद्याच्या दृष्टीनेहि महत्त्वाचा आहे. सभाबंदीचा हुकूम झाला असता 'सरकारच्या वाइटावर असलेल्या काही इसमानी ही सभा भरविली व खोट्या थापा मारून त्या सभेस शक्य तितके अधिक इसम गोळा केले पण त्या सभेला जाण्यात धोका काय आहे तो कळविला नाही ' असे मि. आयव्हिंग म्हणतात । सरकारच्या वाइटावर असलेले हे इसम कोण ? त्यानी कोणत्या बाता झोकून दिल्या याचा मि. आयव्हिंग हे खुलासा करतील काय ? या घुशींच्या सापळ्यात शक्य तितकी अधिक सावजे कोंड- ण्याचा लबाडीने प्रयत्न करण्यात आला ही गोष्ट सरकारलाहि कबूल आहे. पण सभेची उभारणी करणारा हंसराज हा तर पोलिसांचा हस्तक ! शिवाय सभेच्या आधी तीन वाजल्यापासून त्या जागी गुप्त व उघड पोलीस अधिकारी येऊन गेले व गोळीबार सुरू होण्याच्या आधी दहा मिनिटे त्या सर्वानी आसपासच्या घरात दडी मारली. पण तत्पूर्वी एकानेहि श्रोतृवर्गापैकी एकालाहि त्या घुशीच्या सापळ्यातून निघून जाण्याविषयी सूचना किंवा इषारा किंवा हुकूम दिला नाही. अर्थात हेच इसम सरकारचे 'हितशत्रु' (ill-wishers ) ठरत नाहीत काय ? याच जाहिर- नाम्यात मि. आयव्हिंग आणखी असे जाहीर करतात की ही कत्तल करणान्यात एकहि युरोपियन शिपाई नव्हता पण हे जाहीर करण्यातला हेतु काय ? ही अमानुष कत्तल युरोपियन सोजिरानी केली नसून तुमच्याच शिपायानी केली हाच ना या 'न मया' म्हणण्यातला अभिप्राय ? पण कानावर हात ठेवण्याच्या या असल्या क्लप्सीने त्या कत्तलीचा अमानुषपणा जास्तच निंद्य ठरतो. हा गोळीबार करणे न्याय्य होते असे जर तुमचे मत आहे तर हे 'न मया' म्हणण्यात मतलब काय ? आणि तो गोळीबार चुकीचा व राक्षसीपणाचा होता असे जर तुमचे मन तुम्हास खात असेल तर गोळीबार करणारे शिपाई गोरे नव्हते एवढ्याने जनरल डायरच्या शिरावरचे पापाचे खापर दुसन्याच्या माथी थोडेच फुटणार आहे ! या आसुरी कृत्याची जबाबदारी एकमेकावर लोटण्याचा प्रयन कसा चालला होता याची कल्पना ता. १४ रोजी घडलेल्या हकीकतीवरून चांगली करता येते. त्या दिवशी कोतवालीत प्रमुख नागरिकांची सभा भरली होती. त्या वेळी डायरने स्पष्ट सांगितले की मी सीधा माणूस आहे मला डावपेंच काही कळत नाहीत. लढाई म्हटल्यानंतर मला फ्रेंच रणभूमि व अमृतसर सारखेच आहे. या भाषणावरून जनरल डायर याची अमृतसरच्या दंग्यासंबंधी भलतीच कल्पना करून देण्यात आली होती हे उघड दिसते व त्याची जबाबदारी मि. आयव्हिंग याच्या शिरावर येऊन पडते. अर्थातच मि. आयव्हिंग यास ती असह्य होऊन त्याच सभेच्या वेळी खानबहादूर गुलाम सादिक हे बोलावयास उभे राहिले