पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/४०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ५ विलायतेतील चळवळीचे समालोचन ७९ हिंदी मनुष्याच्या मनाला जो तिढा पडतो तो इंग्रजांच्या मनाला पडणे शक्य नाही. बहिष्काराची ओळख इंग्रजाला आहे. पण अमेरिकेत आणि आयर्लंडात त्याचा उपयोग इंग्रजाविरुद्ध झाल्याने त्याच्याशी सद्भावनांचे साहचर्य आहे असे इंग्रज मानीत नाहीत. कर न देण्याची चळवळ सतराव्या शतकात इंग्रजांच्या पूर्व- जांनी केली. पण अलीकडील दोनतीन शतकात त्यांच्या घरी स्वराज्य असल्याने जुलूम केला तरी तो आपल्या प्रतिनिधींनी म्हणजे आपलाच आपल्यावर आहे, आणि चुका करणारे प्रधानमंडळ आपल्याला बदलून घेता येते, याविचाराने करबंदी पर्यंत त्यांच्या चळवळीची मजल जातच नाही. मताभिलाषी बायानी सत्याग्रह केला. पण हिंदुस्थानात तसले कारण नाही असेच इंग्रज मानतो. आणि ज्याच्या हाती जागते व खेळते स्वराज्य त्याला असहकारिता शब्दाचा अर्थ कसा कळणार ? कारण असहकारिता परक्या राज्यकर्त्यांशी करावयाची असते. म्हणून ती हिंदुस्थानात कळते. विलायतेत असहकारिता कळणे म्हणजे डाव्या हाताने उज- व्याला व उजव्याने डाव्याला खाजवावयाचे नाही, हाताने तोंडात घास घाला- वयाचा नाही, आणि तोंडाने तो शरीराकरिता चावावयाचा नाही इतका विपरीत- पणा इंग्रजाला असहकारितेत वाटणार. निःशस्त्र प्रतिकार हे तर इंग्रज ढोंगच मानील. कारण ते त्याच्या बापजाद्याला कधीच माहीत नाही. सशस्त्र प्रतिकारात त्याचा पाय पुढे असतो. पण हिंदी लोकानी आपल्या जातभाईंवर तो केलेला त्याला कसा खपेल ? स्वराज्यासंबंधाने त्याला स्वातंत्र्याची कल्पना चांगली आहे. पण स्वातंत्र्य हा पदार्थ त्याला आवडत असला तरी हिंदी लोकांना तो आवडतो असेच मुळी त्याला वाटत नाही. आणि त्याला तो आवडला तरी पचनी पडणार नाही तर त्याच्या अंगावर उलटेल असे त्याला वाटते. तात्पर्य विलायतेस जाऊन तेथील लोकापुढे आम्हाला वसाहतीसारखे काही तरी स्वराज्य पाहिजे असे आमच्या पुढाऱ्यांनी सांगितले तर तेथील लोकाना ते कळते व त्याचे कदा- चित् कौतुकही त्याना वाटते. पण जी नवी साधने इकडील लोकांना सुचतात, आणि नवे तेज उत्पन्न करण्याकरिता ज्यांचा तात्पुरता तरी उपयोग इकडील पुढारी करून घेतात, ती साधने इंग्रजांची नव्हेत म्हणून त्याना पटत नाहीत ! साध्याची कल्पना त्यांची उचलली म्हणून पटते. पण साधनांपैकी अर्ज विनंती सभा व व्याख्याने यांच्याशिवाय इतर कोणतीहि साधने त्याना पटत नाहीत. राष्ट्रीय पक्षातील नव्या पिढीच्या मार्गात ही अडचण मोठीच होती. आणि टिळक चित्तरंजनदास अरविंद घोस इत्यादि पुढारी चळवळीकरिता विलायतेत गेले नाहीत त्याचे देहि एक विशेष कारण होय. विलायतेत इकडल्यापेक्षा जीभ थोडी अधिक सैल करून कोणी हिंदी गृहस्थ बोलला तरी चालते अशी इकडे समजूत आहे व ती काहीशी खरी आहे. विलायतेत अशा भाषणावर कोणी खटले करीत नाही. पण हिंदुस्थानात अधिकाऱ्यानी राजद्रोहाचा अर्थ फार विस्तृत आणि मतस्वातंत्र्याची मर्यादा फार संकुचित करून ठेवलेली आहे;