पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ राष्ट्रीय पक्षाची परिषद २७ तील लोकाना परिषदेला येण्याची विनंति केली. पुण्यास परिषद भरणार गोष्ट जात्याच उत्साहवर्धक होती. शिवाय टिळक कारागृहातून सुटून आल्यामुळे त्यांच्या भेटीचा समक्ष लाभ घ्यावा अशी पुष्कळाना सहजच इच्छा. राष्ट्रीय पक्षाने पुनः काम हाती घेतले. त्या कामाला मार्गदर्शक होणारे टिळक स्वतः हजर, आणि उपक्रम राष्ट्रीय पक्षाकडून असला तरी उद्देश काँग्रेसमध्ये समेट घडवून आण- ण्याचाच आहे. या अनेक गोष्टीमुळे परिषद यशस्वी होणार अशी सर्वांना आशा वाटू लागली व ती पुढे सफलहि झाली. परिषदेचे अध्यक्ष म्हणून बॅ. बॅपटिस्टा यांची निवडणूक केली व ती त्यानी मान्य केली. याच सुमारास प्रिव्ही कौन्सिल- मध्ये ताई महाराजांच्या खटल्याचा निकाल अखेर टिळकाना अनुकूल असा झाला ही बातमी आल्यामुळे उत्साहाच्या दुधात आनंदाची साखर पडली. पुणे शहरात व लष्करात जाहीर सभा भरून प्रतिनिधींची निवड करण्यात आली. इतर ठिका- णीहि अशाच सभा भरून निवडणुकी होऊ लागल्या. परिषद ता. ८ रोजी सकाळी किर्लोस्कर नाटकगृहांत सुरू झाली. स्वागताध्यक्ष अण्णासाहेब पटवर्धन यांचे भाषण झाल्यावर बॅ. बॅपटिस्टा यांची निवडणूक होऊन त्यानी मोठे वक्तृत्व- पूर्ण भाषण केले. प्रारंभी सहजच त्यानी टिळक सुटून आल्याचा उल्लेख केला. ते म्हणाले “पूर्वी ग्रीस वगैरे देशात राजकीय पुढाऱ्याना हद्दपारी घडे. पण देशावर एखादे संकट आले म्हणजे त्यानाच परत बोलावून त्यांच्या पुढारीपणाने संकटांचा परिहार करून घेत. आज स्वराज्यविहीन हिंदुस्थानाला तर कायमचे संकट आहे. पण युद्धामुळे सरकारावरहि संकट आले आहे. अशा वेळी टिळकांसारखे पुढारी बंधमुक्त होऊन आले हा सर्वानाच लाभ होय." नंतर त्यानी ताई महाराज प्रकरणी हायकोर्टातील चंदावरकर यांच्या निकालावर टीका करून टिळकाना शीलभ्रष्ट करण्यासारखे आरोप आणले गेले ते प्रिव्ही कौन्सिलने धुऊन टाकले याबद्दल टिळ- कांचे अभिनंदन केले. नंतर महायुद्धाचा उल्लेख करून याप्रसंगी विलायतेत चळवळ करावी स्वराज्याची एखादी योजना बनवावी आणि होमरूलच्या नावाने मागणी करावी असे त्यानी सुचविले. समेटासंबंधाने ते असे म्हणाले की, " मवाळजहाल हा भेद आपण विसरला पाहिजे. सर्वच आपापल्या परी नॅशनॅलिस्ट म्हणजे देशा- भिमानी आहेत. मवाळ म्हटला की तो गवळ्याच्या दुधाप्रमाणे बेचव आणि जहाल म्हटला म्हणजे हातात कोलीत घेऊन नाचणारा अत्याचारी असतो ही समजूत टाकून द्यावी.” परिषदेत पहिला ठराव महायुद्धासंबंधाचा होता. त्यात दोस्त- राष्ट्राना यश चिंतिले होते. हा ठराव टिळकानी मांडला. ते म्हणाले युद्धातील उभय पक्ष ईश्वर हा या कामी आपल्या बाजूचा आहे असे म्हणून त्याला आपणाकडे खेचीत असल्यामुळे कोणीकडे जावे याविषयी ईश्वरालाहि अडचण पडली असेल. पण कोणतेहि राष्ट्र कितीहि लहान असले तरी त्याच्या स्वातंत्र्याचे रक्षण व्हावे असे जो म्हणत असेल तोच खरा सत्पक्ष व तिकडेच ईश्वर जाईल. म्हणून