पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०४ लो० टिळकांचे चरित्र ( १९ ) वकील व त्यांची मते भांग ४ पार्नेल प्रकरण व चिरोल प्रकरण यात अनेक दृष्टीनी साम्य आहे. पण विरोधाचाहि एक मोठा मुद्दा आहे. पार्नेल कमिशनमध्ये मुख्यतः राजकीय मुद्यावरच वाद होता आणि पार्नेल प्रभृति लोकानी अत्याचाराना सहानुभूति दाखविली असा त्यांच्यावर आरोप होता. टिळकांवरहि सरकारचा आरोप तोच होता. कमिशनपुढे पार्नेल प्रभृति लोक बोलून चालून आरोपीसारखे होते. चिरोल प्रकरणात टिळक हे मूळ फिर्यादी असले तरी उलटतपासणीचे वेळी ते जवळ जवळ आरोपीसारखेच होते. तथापि पार्नेलचे वकील सर चार्लस रसेल आणि टिळकांचे वकील सर जॉन सायमन या दोहोमध्ये जमीन अस्मानाची तफावत होती. सर चार्लस रसेल यानी पार्नेल प्रभृति लोकाशी तादात्म्य होण्याइतकी सहानुभूति ठेवली होती. उलट सर जॉन सायमन यानी अशी दक्षता ठेवली की व्यक्तिशः टिळकांशी आपली सहानुभूति काडीइतकीहि दिसू नये. असून दिसू नये असे नव्हे तर मुळातच नव्हती. अप्रिय अस्पृश्य किंवा भयंकर पदार्थ कोणी जसा दुरून चिमट्याने उचलतो त्याप्रमाणे सर जॉन सायमन यानी टिळकांच्या प्रकरणाला वकीलपत्त्राच्या चिमट्याने दुरून स्पर्श केला होता. त्याना भीति अशी वाटे की वकील या नात्याने आपण टिळकाविषयी एखादा शब्द चुकून अनुकूल बोललो आणि त्याचा अर्थ लोक भलताच समजले म्हणजे सर जॉन सायमन यांची टिळकाविषयी सहानुभूति आहे असा कोणाचा चुकून समज होईल. व तसा झाला तर ती आपत्तिच होय असे त्याना वाटे. 'तुमचा माझा हा संबंध केवळ धंद्याचा फक्त बाजारी असाच आहे' हे टिळकाना बजावण्याचे सायमन साहेबांच्या मनात प्रथमपासूनच होते. पण त्याला प्रसंग आला नव्हता. तो त्यांच्या सुदैवाने दादा- साहेब करंदीकर यानी उपस्थित केला. मुकदम्याची चर्चा करण्याकरिता टिळकांचे बॅरिस्टर सॉलिसीटर वकील पक्षकार हे सर्व एके दिवशी एकत्र बसले असता टिळक व चिरोल यांच्या साक्षीविषयी प्रश्न निघाला तेव्हा करंदीकर यानी टिळक किंवा चिरोल याना विचारण्याकरिता एक प्रश्न सुचविला. ते म्हणाले हा प्रश्न विचारण्यासारखा आहे असे मला वाटते. तेव्हा सायमन म्हणाले तो प्रश्न मुख्य मुद्याना धरून फारसा आहे असे मला वाटत नाही. त्यावर करंदीकर सहज बोलून गेले की • पण तो कदाचित आम्हाला हिंदुस्थानात उपयोगी पडेल.' हे शब्द ऐकताच सायमन साहेब एकदम उसळले व करंदीकरावर रागावून म्हणाले "मला तुमच्या हिंदुस्थानाशी काय करावयाचे आहे ? ज्या गोष्टीचा मला अंदेशा वाटत होता तीच तुम्ही होऊन बोलून दाखविली बरे झाले. मी तुम्हाला एकदाच सांगून टाकतो की केवळ टिळकांचा वकील याहून या खटल्यात माझा काडीइतकाहि अधिक संबंध आहे असे समजू नका. केवळ वकिलीच्या नात्याने मी उभा राहणार आहे. आणि टिळकांच्या बाजूचे मी काही बोललो तर राजकारणाच्या दृष्टीने