पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ गोपाळराव गोखले यांचा मृत्यु २१ ओढवेल असे माहीत असता त्यानी ते मुद्दाम लिहिले असे ज्याने मनात किंवा जनात म्हणेल तो स्वतःच हीन भावनेचा मनुष्य असला पाहिजे यात शंका नाही. शुक्रवार ता. १९ फेब्रुवारी रोजी रात्री गोपाळराव गोखले याना मृत्यु आला. त्यांची प्रकृति अलीकडे बरेच दिवस खालावली होती. काळजाच्या एका विकाराने ते आजारी असत व त्यांचे हे दुखणे दिवसेदिवस वाढत चालले होते. काळजाचा विकार हा दोन चार वर्षाचा जुना असून विलायतच्या एका प्रवासात जहाजावरील एका दाराचा धक्का छातीला लागून तो अधिकच वाढला होता. त्यातच परिश्रम करण्याची त्याना अनिवार हौस असल्यामुळे आणि ते विश्रांति अशी थोडी घेत असल्यामुळे पुढे पुढे त्याना रात्री झोप येत नसे. आणि आली तरी फार वेळ टिकत नसे. म्हणून त्यानी सोसायटीतल्या एखाद्या गृहस्थाला अवेळीच उठवून आणून त्याच्याशी गोष्टी बोलत बसावे किंवा काही खेळ काढून खेळत बसावे आणि अशाने रात्र घालवावी. अशा रीतीने पळापळाने अंतकाळ जवळ येत आहे हे गोखल्याना दिसत होते. पण त्याला त्यांचा किंवा त्यांच्या डॉक्टराचा काही इलाजच नव्हता. काळजाचा विकार मनुष्याला केव्हा दगा देईल याचा नेम नसतो. तरी पण ते इतक्यात जातील असे कोणास वाटले नाही. शेवटी शेवटी त्यानी कामाचा हात थोडा आखडला होता व डॉक्टर लोक सक्त पहारा ठेवून त्याना कोणाशी फार बोलू देत नव्हते. पण त्यांच्या प्राणाला ओहोटी लागली ती लागलीच. आणि इतके दिवस ते जगले हे तरी काम करण्याच्या हौसेनेच जगले असेहि म्हणता येईल. मरणसमयी गोखल्यांचे वय अवघे ४९ वर्षांचे होते. एका दृष्टीने ते आग- रकर, आपटे वगैरे समव्यवसायांपेक्षा अधिक जगले परंतु हे काही तरीच समाधान होय. टिळकांसारखे त्याना साठ पासष्ट वर्षे आयुष्य लाभते तर त्यांच्या हातून आणखी किती तरी काम झाले असते. पण जेवढे आयुष्य त्याना लाभले त्यातच त्यानी इतर अनेक लोकापेक्षा फार अधिक काम करून दाखविले. म्हणून टिळकानी केसरीतील त्याच्या मृत्यूलेखावर 'मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमायित चिरं' असे जे अवतरण लिहिले तेच खरे. गोपाळराव गोखले हे एका गरीब कुळात जन्मले. कागल येथील त्यांच्या वडिल भावाने त्यांचे एकंदर शिक्षण केले आणि अल्पवयातच ते बी. ए. झाले. पण स्वार्थत्यागाची वृत्ति मनात असल्यामुळे टिळकांच्या उज्ज्वल उदाहरणाने मोहून त्यांच्याच बोलावण्यावरून ते न्यू इंग्लिश स्कूलला येऊन मिळाले व लाईफ मेंबर झाले. पुढे त्यांचे व टिळकांचे ग्रह जमले नाहीत ही गोष्ट वेगळी. शिक्षकाचे काम थोडे दिवस केल्यावर त्यांची बुद्धिमत्ता, इंग्रजी लिहिण्या बोल- ण्याची हातोटी, कोणत्याहि विषयाचा अभ्यास करण्याची इच्छा आणि मर्मग्राह- कता व सर्वात विशेष म्हटले म्हणजे विनयशीलता हे त्यांचे गुण पाहून माधवराव रानड्यांनी त्याना निवडून आपल्या आवडत्या शिष्यवर्गात सामील केले. आणि तेव्हांपासून त्यानी रानड्यांच्या ठिकाणी जी गुरुनिष्ठा ठेविली ती यावज्जन्म, आणि