पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ विलायतेतील सुनावणी सायमन – होय पुढे एक मनुष्य सापडला. त्याचे नाव खाडिलकर असे होते. कार्सन–नव्हे नव्हे. त्याचे नाव चाफेकर असे होते. सायमन—कोणीहि असो. तो सापडल्यावर त्याच्यावर खटला झाला. त्याला शिक्षा झाली. सर्व काही झाले आणि ते यथायोग्य झाले. तो ब्राह्मण होता हेहि खरे. पण आयर्लंडात जितके आयरिश लोक असतील तितकेच हिंदुस्थानात ब्राह्मण असतील. डार्लिंग–नाही नाही अधिक असतील. सायमन कदाचित असतील. माझ्याजवळ काही आकडे नाहीत. पण मला एवढे दाखवावयाचे की ब्राह्मणासारख्या एका जातीतील एखाद्या व्यक्तीने असले कृत्य केले म्हणून त्या सगळ्या जातीचे त्यात अंग होते हे म्हणणे गैर- वाजवी होईल. कार्सन–प - पण मी तरी तसे कोठे म्हणतो? सायमन – टिळक वर्तमानपत्रातून अगदीच निरपवाद लेख लिहितात किंवा त्यानी राजद्रोहाचे उद्गार नेहमीच टाळले होते असे मी तुम्हाला म्हणत नाही. क्वचित खटले होऊन शिक्षाहि झाल्या आहेत. पण राजकीय राजद्रोह व खुनासारखे अत्याचार ह्या गोष्टी अगदी वेगळ्या आहेत हे कार्सन सुद्धा कबूल करतील. चिरोल साहेबानी गैर केले ते हेच की ह्या शिक्षाचा फायदा घेऊन टिळकाना खुनाचे चिथावणीला नेऊन भिडविले. जॅक्सन ह्यांचा खून १९०९ साली झाला. पण तो नाशिकास झाला तो गाव टिळकांचा नव्हे. टिळक त्यावेळी तुरुंगात होते. १९०६ साली म्हणजे खुनापूर्वी तीन वर्षे टिळक नाशकास तीन दिवस होते. टिळकांना ही ६ वर्षाची शिक्षा झाली ती आपण कदाचित त्यांच्या गुणामुळे योग्य झाली असे म्हणा. पण ह्या काळात घडलेल्या गोष्टीत त्यांचे अंग होते किंवा त्यांच्या वजनाने किंवा त्यांच्या उपदेशामुळे ह्या गोष्टी घडून आल्या हे म्हणणे योग्य होणार नाही. तरी पण जॅकसनच्या खुनाची जबाबदारी चिरोल साहेब टिळका- वरच लादतात. डार्लिंग – पण कान्हेरे यानी मॅजिस्ट्रेट पुढील जबानीत काय सांगितले? सायमन–केसरी राष्ट्रमत काळ ही पत्रे वाचून माझ्या मनावर परिणाम झाला असे तो म्हणाला हे खरे, पण केसरी टिळकांचे पत्र असले तरी टिळक कोठे होते? असे असता चिरोल साहेब लिहितात की जॅक्सनचा खून खरोखर कान्हेरे याने केला नाही तर टिळकांनीच केला. पण नाशकातील त्या वेळच्या वातावरणाशी हजारो मैल दूर असलेल्या टिळकांचा काय संबंध? डार्लिंग–पण चिरोल साहेब तरी इतकेच म्हणतात की कान्हेरे व टिळक ह्यांचा प्रत्यक्ष परिचय किंवा संबंध नव्हता तर टिळकांच्या पत्राने बरेच दिवस पर्यंत सतत जो विषवृक्ष हळुहळू वाढविला त्याचे हे फल होय.