पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ४ कार्सन साहेबांचे शब्दचित्र १०७ सर्वांचे जे तुम्ही उत्कृष्ट व भूषणास्पद समर्थन केले ते आमच्या हृदयात अखंड राहील व त्याबद्दल आम्हाला आपल्याबद्दल ममता व कौतुक वाटते." (२०) कार्सन साहेबांचे शब्दचित्र कोणच्याहि खटल्यात हवा तसा वकील मिळणे ही महत्त्वाची गोष्ट असते. जसा पुरावा चांगला लागतो तसा वकीलहि चांगला लागतो. टिळकांच्या तर्फे बॅरिस्टर पसंत करिताना काय अनुभव आला हे वर सांगितलेच आहे. आता प्रतिवादीच्या वकीलाकडे पाहू. चिरोल साहेबाना सर एडवर्ड कार्सन हे वकील मिळाले ही गोष्ट त्यांच्यातर्फे पुष्कळच फायद्याची झाली. कारण त्यांचे मनच लोकपक्षाविरुद्ध होते. आणि लोकपक्षाला पाण्यात पाहणारा राजकारणातील पुराणमतवादी व सरकारपक्षाचा वाली असा वकील मिळाल्यास तो जितका समरसपणाने चिरोल साहेबांची बाजू मांडील किंवा टिळकांविरुद्ध हल्ले चढवील तितका दुसरा चढविणार नाही. ह्या दृष्टीने कार्सन साहेबांचे नाव चिरोल साहे- बांच्या सालिसिटराना सुचले असल्यास व कार्सन साहेबानी तो खटला हौसेने घेतला असल्यास नवल नाही. कार्सन साहेब हे आयरिश होमरूल चळवळीचे कट्ट्यातील कट्टे शत्रु. आणि आयर्लंडला आता होमरूल मिळणार असे जेव्हा एक दोन प्रसंग आले तेव्हा यानी जवळ जवळ उघडपणे बंडाचे निशाण उभारले. आणि 'आम्ही युद्ध करू पण आयरिश लोकांच्या राज्याखाली जाणार नाही' अशी प्रधानमंडळाला ताकिद दिली. पण ह्या गृहस्थाचे वर्णन आम्ही देण्यापेक्षा एखाद्या तिन्हाइताच्या शब्दानीच दिलेले बरे. कारण चिरोल साहेबांचे वकील म्हणून कार्सन साहेबाविषयी आमचे मत कलुषित असण्याचा संभव उघड आहे हे आम्हीहि कबूल करितो. सुदैवाने कार्सन साहेबांचे एक वर्णन एका प्रसिद्ध इंग्रज लेखकाने केलेले नुकतेच आमच्या पाइण्यात आले आहे. म्हणून त्याचाच थोडासा अनुवाद येथे करितो. A. G. Gardiner हे 'डेली न्यूज' पत्राचे एक माजी संपादक होत. विलायतेतील अत्यंत नामांकित वर्तमानपत्रकारापैकी ते एक असून चरित्र लेखकात तर ते अग्रगण्य मानले जातात. त्यानी १९१६ साली Pillars of Society ह्या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात काही प्रसिद्ध पुरुषांची वर्णने दिली आहेत. त्यात कार्सन साहेबांचेहि दिले आहे. त्याचा सारांश असाः - " पुराणकाळी सुष्ट व दुष्ट देवता असत. त्याचप्रमाणे ऐतिहासिक काला- तहि सुष्ट व दुष्ट अशा दोन्ही प्रकारच्या विभूति होऊन गेल्या. कार्सन ही एक त्यातलीच विभूति होय. त्याना ऐतिहासिक पुरूष असेहि म्हणता येईल. ते नसते तर बंडखोर अल्स्टर प्रांताला कोणीहि विचारले नसते. आणि होमरूलच्या युद्धात हा वीर जगप्रसिद्ध झाला. मात्र ही प्रसिद्धी चांगल्या स्वरूपाची नाही! तरी पण त्यांचे शौर्य व धैर्य ही कोणासहि कबूल केली पाहिजेत. पडता पक्ष त्यानी उच-