पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ लो. टिळकांचे चरित्र भाग ४ घेणारे लोक प्रारंभी तर होतेच व निकाल टिळकांविरुद्ध झाल्यावर त्या लोकांची संख्या वाढली यात आश्चर्य नाही. आमच्या माहितीप्रमाणे दाजीसाहेब खरे यानी ही फिर्याद तुम्ही विलायतेत लावू नका असा सल्ला टिळकाना दिला होता. पण टिळकानी तो मानला नाही. याचे कारण टिळकांची दृष्टि खरे यांच्याहून थोडी वेगळी होती. अब्रुनुकसानीची निरनिराळी वाक्ये हे निरनिराळे मुद्दे म्हणून कोर्टाने काढले तर निदान एक दोन मुद्यावर आणि तेहि मुख्य मुद्यावर आपल्यासारखा निकाल होईल अशी टिळकाना आशा वाटत होती. ही त्यांची अपेक्षा न्या. डार्लिंग यानी फसविली व सगळे मुद्दे एकवट करून ज्यूरीकडून एकेरी निकाल मागितला ! पण दुसरी गोष्ट अशी की ताईमहाराज प्रकरणात प्रिव्हि कौन्सिलने मुंबई हायकोर्टाचा ठराव फिरविला या गोष्टीने टिळकाना सहजच आशा उत्पन्न झाली की चिरोल प्रकरणातहि आपणाला जय का न मिळावा ? डार्लिंगसारखा न्यायाधीश भेटेलच अशी कल्पना त्याना असण्याचे कारण नव्हते. इंग्रज सर- काराविरुद्ध टिळक कितीहि लिहित बोलत असले तरी इंग्लंडातील इंग्रज हा व्यक्तिशः मोठा चांगला असतो अशी त्यांची समजूत होती. आणि 'हेच या शहाण्याचे वेडेपण' असे म्हणून या उदार मताबद्दल त्यांची थट्टा करणारे व टर उडविणारेहि काही लोक त्यांच्या मित्रमंडळीत होते. पण एकदा मनाने एखादी गोष्ट घेतली म्हणजे मग त्या बाजूनेच सर्व काही दिसू लागते. राजकीय स्वरूपाच्या खटल्यात न्याय मिळत नसेल. पण हा तर दिवाणी खासगी दावा. ज्यूरीला टिळक काय माहीत ? आणि असले तरी ते कीर्तिमान अशीच त्यांची समजूत असावी. चिरोलसाहेबा- बद्दल ज्यूरीचा अनुकूल पूर्वग्रह असण्याचे काहीच कारण नाही. फिर्याद खासगी बेअब्रूची असल्यामुळे सरकारचा प्रेष विलायती ज्यूरीपर्यंत पोचणार नाही. अशी समजूत टिळकानी आपल्या मनाशी केली होती. ( २ ) पूर्व तयारी ता. १४ ऑक्टोबर स. १९१६ च्या पत्रात टिळक सॉलिसिटर याना लिहितात " माझ्या साक्षीबद्दल मी तुम्हास पूर्वी कळविलेच आहे. मी स्वतः विलायतेस येऊन ज्यूरीपुढे हजर राहणार. येथे माझी साक्ष व्हावी अशी इच्छा नाही. आणि मी स्वतः आल्यावर माझ्याकरिता कमिशन कशाला ? चिरोल- साहेबाना बचाव करण्याचे माझ्या दृष्टीने काहीच साधन नाही. आपण काढलेल्या सहा मुद्यावर त्याना प्रत्यक्ष व तोंडी असा पुरावा काय मिळणार ? संभावित साक्षीदार कोणी येईल असे वाटत नाही. कारण त्याला काही तरी खरे किंवा खोटे सांगण्याला यावे लागणार. एखादा कोणी हलका मनुष्य आला तर उलट तपासणीत त्याची फजीती होईल. खुनासारख्या बाबतीत माझा संबंध पोचतो असा कोणता पुरावा त्यांच्याजवळ असणार? असता तर तो पुढे आल्याशिवाय कसा राहता ? येऊन जाऊन त्यांची भिस्त केसरी मराठा वगैरे पत्रांचे अंक