पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग ४ प्रस्तावना करून दिली. पुढे टिळकानी फिर्याद केल्यावर मुंबई सरकारचे पोलिटिकल खाते आणि डोंगरे व जाधवराव याना चिरोल साहेबातर्फे साक्षी देऊन पूर्वी केलेले काम निस्तरावे लागले. न निस्तरून सांगतात कोणाला ? कारण जाधवराव व डोंगरे यानी करवीर सरकारच्या उदार आश्रयाने चिरोलसाहेबांच्या पुस्तकाचे भाषांतर करून छापविले होते. आणि टिळकांची फिर्याद चिरोलसाहेबावर शेकली असती तर ती पुढे त्यांच्यावर हि शेकल्याशिवाय राहती ना ! म्हणून हे पुढचे 'श्राद्ध सव्यापसव्य' वाचविण्याकरिता याना 'आधी बाप दाखवा'वा लागला. असो. टाईम्स चिरोल व त्यांचे सहाय्यक या सर्वांचा संबंध या प्रकरणात येत असल्यामुळे त्यांच्याविषयी हा प्रास्ताविक उल्लेख केला आहे. परंतु आणखी मुद्याच्या एकदोन गोष्टी सांगणे जरूर आहे त्या सांगतो. टाईम्सपत्राचे धोरण कोणते हे वर सांगितलेच आहे. पण हे धोरण त्याच्या अंगाशी पूर्वी अनेकदा आलेले होते. पार्नेल केसमध्ये बनावट पत्ते टाईम्सने छापली व ती बनावट ठरल्यावर त्याला खाली पहावे लागले. त्याचे बातमीदार चिरोलसाहेब यांचीहि वृत्ति अत्यंत उद्दामपणाची असून तिजबद्दल त्याना हिंदुस्थानात पूर्वी एकवेळ अद्दलहि घडली होती. तिचा प्रकार असाः- दिल्ली दरवाराची हकीगत बातमीदार म्हणून लिहून पाठविण्याला चिरोल- साहेब विलायतेहून १९०३ साली इकडे आले होते. ते प्रवास करीत असता गाडी साहरणपूर स्टेशनावर थांबली. त्या दिवसात प्लेगतपासणीचे ते एक ठाणे होते. आणि डॉक्टर लोकाना सर्व प्रवाशांची तपासणी करण्याचा हुकूम होता. इतर प्रवाशांची तपासणी करता करता हिंदी डॉक्टर चिरोल साहेबांच्या डब्याशी आला आणि तुम्ही कोठून आला असे विचारून नाडी पाहण्यासाठी त्याने चिरोलसाहेबांच्या अंगाला स्पर्श केला. साहेबमजकुराना ही गोष्ट न खपून ते डॉक्टरसाहेबाना ठोसे चढवू लागले. जवळचा पोलिस मध्ये पडला व त्याने हे डॉक्टर आहेत असे सांगितले. तेव्हा चिरोलसाहेबानी आपल्या नावाची कार्ड काढून त्याला दिली आणि 'थांब तुझा आता रिपोर्ट करतो' अशी उलट डॉक्टरालाच धमकी दिली. पुढे डॉक्टराने फिर्याद केल्यावरून चिरोलसाहेबाना समन्स लागून कोर्टात हजर राह- ण्याची पाळी आली. चिरोलसाहेबानी हे संकट टळण्याकरिता लॉर्ड कर्झनसाहे- बाना मध्यस्थी करण्याची विनंति केली. पण तीही फुकट जाऊन त्यानी कोर्टात फिर्यादीची लेखी माफी मागितली ! चिरोलसाहेब हे त्यावेळी इतके प्रख्यातीला आलेले नव्हते. पण पुढे त्यानी आपले लेखांचे पराक्रम केले तेव्हा सात आठ वर्षांपूर्वी झालेली ही गोष्ट पुष्कळांच्या स्मरणातून गेली होती ! ताईमहाराज प्रकरणात टिळकानी कसे वागावयास पाहिजे होते याविषयी कित्येक लोकाकडून कसे आक्षेप घेण्यात येत होते हे त्या प्रकरणात आम्ही नमूद केलेच आहे. तो वाद अखेर टिळकानी जिंकला. तरीहि काही आक्षेप घेणारे उरलेच. मग चिरोल केससारख्या प्रकरणात टिळक कोर्टात गेले याबद्दल आक्षेप