पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ लखनौची राष्ट्रीय सभा (१०) लखनौची राष्ट्रीय सभा बेळगावच्या परिषदेमध्ये राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय सभेत शिरण्याचे ठरविल्या- बरोबर लखनौच्या सभेला जाण्याचा अपूर्व उत्साह सर्व लोकात प्रगट झाला. लखनौच्या राष्ट्रीय सभेला जितके प्रातिनिधिक स्वरूप होते इतके कोणत्याहि राष्ट्रीय सभेला पूर्वी आले नव्हते व आता तर ते येतच नाही ही गोष्ट कबूल करणे प्राप्त आहे. कोणी आला कोणी गेला तरी राष्ट्रीय सभा गेली ४२ वर्षे सतत चालू राहिली आहे. या अवधीत तिला हजर असलेल्या प्रतिनिधींच्या दृष्टीने पाहता दोन चार प्रकार दृष्टीस पडतात. प्रथम काही वेळ प्रातिनिधिक स्वरूपाचा पण लहानसा समुदाय. त्यात हिंदु मुसलमान ख्रिस्ती अँग्लोइंडियन युरोपिअन इतक्या सर्वांचा समावेश होता. यानंतरच्या काळात प्रतिनिधींची संख्या वाढली पण हळुहळू मुसलमानांची संख्या कमी झाली. कारण सर सय्यद अहमद यानी केवळ शिक्षणाचा कार्यक्रम आपल्या समाजापुढे उचलून धरला व राष्ट्रीय सभेसारख्या राजकीय संस्थेत मुसलमान सामील झाले तर त्यांचे नुकसान होण्याचा संभव आहे. ही गोष्ट परोपरीने शिकविली. तिसऱ्या कालावधीत मुसलमान बाहेरच राहिले पण आत उरलेल्या समाजात जहाल व मवाळ असे दोन पक्ष उत्पन्न होऊन त्या कलहाचा कडेलोट सुरतेस झाला. नंतरच्या ६-७ वर्षात राष्ट्रीय सभा इतकी रोडावली की मुसलमान तर नाहीतच पण राष्ट्रीय पक्षहि नव्हता. आणि राष्ट्रीय सभेचे सर्वात निकृष्ट स्वरूप पाहावयाचे तर १९१३ साली बांकीपूर येथे रा. ब. मुधोळकर यांच्या अध्यक्षतेखाली जी सभा भरली त्या वेळी तिला आले होते. यानंतरचा काळ म्हटला म्हणजे लखनौ पासून दिल्ली अमृतसरच्या सभा पर्य- तचा. या अवधीत फिरून मुसलमान राष्ट्रीय पक्ष व नेमस्त पक्ष हे सर्व एकवटलेले होते. नंतर कलकत्त्याच्या जादा सभेपासून राष्ट्रीय सभेच्या जमावाला खूप जोर आला. मुसलमानांचा भरणा पूर्वीपेक्षा पुष्कळ अधिक या अवधीत झाला. पण दुसऱ्या बाजूला नेमस्त व परदेशीय असे कोणीहि राष्ट्रीय सभेत उरले नाहीत. आता फिरून राष्ट्रीय सभेतील संघटनेची चळवळ सुरू झालेली असून नेमस्त व राष्ट्रीय व सहकारी सर्व पक्ष एकत्र होऊ पाहात आहेत. परंतु त्याच्या उलट मुसलमान लोक त्यातून हळुहळु हटत जात आहेत. या दृष्टीने पाहता राष्ट्रीय सभेचा ओघ एखाद्या नदीच्या ओघाप्रमाणे भासतो. प्रथम तिचे स्वरूप लहान होते. परंतु एखाद्या मोठ्या नदीप्रमाणे तिचे पाणी खांडी पडण्याइतकें कधीहि आटलेले नाही. केव्हा केव्हा मधून मधून पूर यावा त्याप्रमाणे तिचे स्वरूप भरदार असे झाले, तर केव्हा केव्हा कडक उन्हाळ्यातील प्रवाहाप्रमाणे तिचे स्वरूप अगदी सूक्ष्म झाले. पण या ४२ वर्षीच्या अवधीत राष्ट्रीय सभेला खरे प्रातिनिधिक स्वरूप लखनौ येथील सभेच्या वेळीच होते असे म्हटले असता फारशी चूक होणार नाही.