पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ३९ टित घडी हवीच आहे. विविध खाती ताब्यात घेऊन कारभार करणे याचेच नाव स्वराज्य. आम्हाला पोलिसखातेच काय ? गुप्त पोलिसखातेहि पाहिजे. नाना फडणी- साचे वेळी गुप्त पोलिसखाते होतेच. गुप्त पोलिसांच्या बातम्यावरच नानाने एल- फिस्टन साहेबाचे दारूगोळा भरलेले मेणे घाटात अडवून चातुर्याने त्याला कुंठित केले अशी गोष्ट सांगतात. पण आज गुप्त पोलिसखाते तेवढे आहे. नानांच्या वेळची सत्ता मात्र नाही. पेशवाई बुडाली तेव्हा व्यक्तिशः बाजीरावाची अंदाधुदि मिटली म्हणून बरे वाटले. लोकानी दूध पाहिले पण त्याचेमागून येणारा बडगा कोठे पाहिला होता ? तो मागाहून हळूहळू प्रगट झाला. बाजीरावशाहीला कंटाळ- लेल्या आणि इंग्रजांचे स्वागत केलेल्या सरदारांची इनामदारांची तरी पुढे वाट काय झाली ? आणि इतके सगळे करून वरती हे म्हणावयाला तयार की स्वदेशा- तली थंड हवा टाकून ह्या उष्ण हवेत तुमच्याकरता आलो. बरे जी देशी राज्ये उरली त्यात तरी कारभार आम्हीच करतो की नाही ? आणि तोहि चांगला करतो की नाही ? मग खालसा मुलखातच आम्हाला नालायकीचा असा कोणता रोग जडला ? बडोद्यास देशी राजा राहून देशी लोकच सर्व कामे करतात. आणि तो राजाही काही स्वतंत्र नाही. पुण्यास पेशवाई शिल्लक उरती व पेशवे गायकवाडा- प्रमाणे परतंत्र असते तरी पुण्याचा कारभार तुम्ही आम्ही केलाच असता की नाही ? निझामच्या राज्यात कारभार कोण करतो? कदाचित पेशव्या ऐवजी आह्मी एखादा निवडलेला अध्यक्ष राजासारखा मानू. आम्हाला स्वराज्य दिले तरी त्यासकट जाऊन आह्मी फ्रान्सला जर्मनीला जाऊन मिळत नाही. फ्रान्स जर्मनी चालेल तर इंग्लंड तरी का नको ? स्वार्थाच्यादृष्टीने परकी कोणी हवेतच तर इंग्रजच बरे. आज इंग्रजाची थोडि बहुत भूक तरी खाऊन भागली आहे. उद्या फ्रेंच किंवा जर्मन घेतले तरी त्याची भूक अगदी ताजी असणार. त्यांच्या भुकेपुढे आह्मी किती टिकू ? स्वराज्ययोजनेचा हा नकाशा तुमच्या डोळ्याला दिसत नसेल तर तुमच्या डोळ्यानाच विकार झाला असे समजा. आज कायदेमंडळे आहेत पण तो पोर- खेळ आहे. शिते टाकून भुते झुंजवावयाची ती जागा आहे. कौन्सिले आहेत पण अधिकारी त्याला जबाबदार कोठे आहेत ? कोणी म्हणतात हे सर्व खरे पण चळ- वळ करून तरी काय मिळणार ? त्याला उत्तर हेच की चळवळीत हिंमत नसेल तर मिळणार नाही. हिंमत धरून उद्योग केला तर १०-२० वर्षांनी तरी मिळेल. आझी मातीच्या गोळ्याला देवपण देणारे लोक, आम्हाला निषेधाने चळवळ यशस्वी का करता येऊ नये? अशा गोष्टी पूर्वी घडल्या आहेत मग आजच का न घडतील ? विश्वासापाठी देव उभा आहे. या उद्योगात कोणी थोडे दिले तर ते घेऊ नका असे माझे म्हणणे नाही. दिले ते घ्या व अधिक मागा पण उद्योग सोडू नका. १०० रुपयाचे माझे येणे त्यांतले १० दिले तरी ते मी घेणार व फिरून ९० मागणार. आणि १० घेतांनाहि वाटेल तर तुझा आभारी असेहि म्हणणार. कोणी पडलेला कागद उचलून हातात दिला तरी आह्मी आभार मानतो, मग