पान:लोकमान्य टिळक यांचे चरित्र -उत्तरार्ध खंड 3.pdf/१०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ राजद्रोहाचा तिसरा खटला ३५ तुझी पिऊ नका म्हणजे झाले. फार तर लोकाना उपदेश करा. पण निवळ उपदे- शानी बंदी कशी होणार ? पण ही बंदी सरकारला करिता येणारी आहे. मात्र ती गोष्ट त्यांच्या मनात आली पाहिजे. तीच गोष्ट दुष्काळी व्यवस्थेची. लोकाना व्यापार हा आमच्या हाती आहे असे वाटते; पण तेहि खोटे. आमचे व्यापारी ' म्हणजे परदेशी मालाचे अडते व दलाल, सरकार परकी म्हणून पदोपदी पर- क्यांचा नफा. पूर्वी मुसलमान राजे होते तेहि परकीच, पण हिंदुस्थानातले उद्योग धंदे वाढावे अशी तरी त्यांची इच्छा होती. परकी याचा अर्थ परक्या देशातून आलेले असा नाही, हिंदुस्थानच्या लोकांचे कल्याण व्हावे अशी खरी इच्छा धर- तील ते कोणीहि परकी नव्हेत. निवळ धर्माने परकी तो परकी नव्हे. कोणाला वाटते जुने राज्य गेले त्याचे जागी हे नवे राज्य आले इतकेच; पण तसे नाही. प्रथम प्रथम इंग्रज उपकारकर्ते वाटले. पण पुढे हो दृष्टि बदलली. प्रथम अशी दृष्टि होती ह्याचे कारण असे की, लोकाना वाटे आम्हाला काय हवे हे सरकारला फक्त कळविण्याचा अवकाश, ते घडून येईल. आमचे मनोगत त्याना समजत नाही त्याला काय करावे? पण सरकारला ही गोष्ट कळत असूनहि वळत नाही, ही गोष्ट पुढे पुढे वरील प्रकारच्या विचारसरणीच्या लोकानाहि मान्य झाली. सरकारला काहीहि सांगावयाला जा, त्याविरुद्ध उलट आपल्यासारखे असते तेवढेच ते बोलतात. दुसरे कोणी म्हणतात " कोणीहि राज्य स्वार्थाकरिता करतो. तो आपली सगळी भाकरी प्रजेला देईल तर राजा होईल तरी कशाला ? म्हणून त्यातील काय चत्कोरभर देतील ती आनंदाने स्वीकारा आणि आभार माना. " पण मला हे मत मान्य नाही. सरकाराने एवढे राज्य कसेहि मिळविले असो. राजे म्हणून त्यांचे काही एक कर्तव्य आहे. उद्यां सरकारने रस्ते न बांधले तर तुह्मी दोष द्याल की नाही ? आणि आह्मी कर देतो तो कशाला असे विचाराल की नाही ? पण रस्ते बांधून किंवा आगगाड्या तारायंत्रे करूनहि सरकारचे कार्य पुरे होत नाही. काही काही गोष्टी सरकारने केल्या. किंबहुना त्या पूर्वीपेक्षा चांगल्या केल्या असेहि आह्मी म्हणतो. पण तक्रार आहे ती न केलेल्या गोष्टींची. त्या सांगा- वयाला गेला म्हणजे त्याना आपला अपमान केलासा वाटतो. पण खऱ्या प्रजा- वत्सल सरकारला असे वाटणार नाही. वाटेल तर सत्ता हाती ठेवा. तीत काही कमी पडू देऊ नका. पण त्या सत्तेच्या पोटात आम्हाला भरपूर हातपाय का पसरू देत नाही ? आम्हाला धनी चालतो पण कोठावळा चालत नाही. हे मधले कोठावळे गेले पाहिजेत व त्यांचे अधिकार लोकाना मिळाले पाहिजेत. स्वराज्य मिळविणे म्हणजे इंग्रज सरकार किंवा बादशाही सत्ता काढून टाकणे नव्हे. ते विचारे येथे येऊन सत्ता चालवितच नाहीत. हे मधले गृहस्थ मोठे शिकलेले हुशार आहेत. पण त्यांचे सारे लक्ष वृत्यंशाकडे आहे. बादशहानी यांच्या कडची पूजा काढून आमचे कडे द्यावी असे आह्मी म्हणतो. कोणी म्हणेल हे पुजारी आणि बादशाहा एकाच वर्णाचे आहेत. पण आम्हाला प्रजा असे एकदां बादशहानी म्हटल्यावर आह्मी