पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मग तिचे जेंडर (समाजाने ठरवून दिलेले) 'स्त्री'चे असे आपण कसे काय म्हणू शकतो? जेंडर हा सेक्स किंवा लिंग या शब्दाला समानार्थी आलेला मॉडर्न शब्द नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

प्रकरण दुसरे
जेंडर संदर्भात नेहमी वापरल्या जाणाऱ्या संकल्पना
आणि त्यांची व्याख्या

• जेंडर अवेरनेस- लिंगपदसमभावाची जाणिव जागृती म्हणजे काय?- प्रत्येक मानव स्वतंत्र आणि वेगळी भूमिका समाजात पार पाडतो तसेच त्या प्रत्येकाची सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकिय, भावनिक, शारीरिक, प्रादेशिक गरज ही स्वतंत्र आहे, हे लक्षात घेऊन ते मान्य करणे आणि ही जाणिव यावी यासाठी तसा प्रचार, प्रसार करणे म्हणजे जेंडर अवेरनेस आणणे होय.

. जेंडर सेन्सिटिव्हीटी-लिंगपदसमभावाची संवेदनशिलता – वरिल व्याख्येप्रमाणे गरजेला मान्यता देऊन प्रत्येक व्यक्तीला ती भूमिका पार पाडण्यासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी समाजात संधी निर्माण करणे म्हणजे समाजात संवेदनशिलता निर्माण करणे होय.

• जेंडर इक्वलिटी-लिंगपदसमभावाची समानता- प्रत्येक व्यक्ती ही समान आहे. मग ती कुठल्याही लिंगाची असो, राज्यातली असो,अथवा भाषा-प्रांतातली असो याला म्हणतात समानता मानणं आणि अशी परिस्थिती असणं म्हणजे समानता असणे.प्रत्येक व्यक्तीला सर्व क्षेत्रात (सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकिय, भावनिक, शारीरिक, प्रादेशिक, कायदेशिर इ.) संधीची आणि अधिकाराची समानता निर्माण करणे तसेच ती समानता मिळावी, अनुभवता यावी यासाठी योग्य ते वातावरण, साधनं आणि संधी निर्माण करणे म्हणजे लिंगपदसमभावाची समानता आणणे होय. उदा.आपल्याकडे समानता यावी म्हणून स्त्रीयांना राजकिय क्षेत्रात आरक्षण तयार केले पण प्रत्यक्षात दलित, आदिवासी स्त्रीया सरपंच झाल्या की काहीतरी कारण पुढे करुन अविश्वासाचा ठराव पास केला जातो आणि त्यांचे पद काढून घेतले जाते. विधानसभा, लोकसभा आरक्षणाचा प्रस्ताव आजपर्यंत अनेक वेळा प्रयत्न केल्यानंतर सत्ताधारी पक्षाला सुद्धा व्हेटो काढावा लागला तेव्हा मोठया मुश्किलीने पास झाला, म्हणजे फक्त कायद्यात असून चालत नाही तर त्याची अंमलबजावणी होण्यासाठी तशी संधी निर्माण करावी लागते.

• जेंडरची चौकट म्हणजे काय?- स्त्री-पुरुषांना समानतेच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी येणारे किंवा घातलेले अडथळे म्हणजे जेंडर चौकट. ही चौकट समजावून घेतल्याशिवाय ती तोडायची म्हणजे काय करायचे हे कळत नाही आणि जोपर्यंत ही चौकट प्रत्येक व्यक्ती तोडत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीचा व्यक्ती म्हणून विकास होत नाही.


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....४