पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

व्हावी, त्याला काय एवढी किंमत दयायची अस एकीकडे म्हणायचे आणि स्त्रीचा अपमान करण्याचे साध्यही मिळवायचे यासाठी किरकोळ मारहाण बाईला आवडते किंवा दोन फटके मारले तरी ती हसतच होती असे गैरसमज निर्माण केले जातात. वरचे विधान मला सांगणा-या एका नव-याच्या बायकोला "तू मारल्यानंतर का हसते?" हे जेव्हा विचारले तेव्हा तिने फार मार्मिक उत्तर दिले. ती म्हणाली, "बाई, मी हसत नव्हते, मला मारण्याचा त्रास होतो, बास आता हे त्याला सूचवायचा प्रयत्न करत होते, त्याला कळले नाही की त्याने कळूनही न कळल्यासारखे केले हे माझ्या लक्षात आले नाही." तिचे शेवटचे वाक्य हे आपल्यासाठी अधिक विचाराला चालना देणारे आहे.

 २. स्त्रीयांना नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते - स्त्रीया या निसर्गतः कमकुवत, नाजूक असतात, त्यांना स्वतःची चाणाक्ष बुद्धी नसल्यामुळे त्या पटकन कोणाच्याही बहकाव्यात येतात, त्यांना मोकळ सोडल तर कुठलाही पुरुष त्यांच्याशी बळजबरी संभोग करेल, ज्यामुळे अनौरस मुलं जन्माला येतील, ज्यामुळे खानदानाच्या बीजाची शुद्धता नष्ट होऊन समाजात अराजकता पसरेल हे सर्व टाळायचे असेल तर तिच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी लहानपणी वडिल, मोठी झाल्यावर नवरा आणि वृद्ध झाल्यावर मुलगा अशी कुठल्या न कुठल्या पुरुशाची गरज भासते असे समाजात विविध पद्धतीने मांडले जाते. अशा या नियंत्रणवादी समाजाचे वर्णन करताना एक स्त्री वादी कवियत्री लिहिते,

"लहानपणामध्ये बापाच नाव,
लगीन झाल्यावर पती हा देव,
म्हातारपणामध्ये पोरांना भ्याव,
असा जीवनी हा सेवाभाव"

 वरची हिंसेबाबतची पुरुषवादी भूमिका ही मानवनिर्मित आहे हे आपल्याला पदोपदी लक्षात येईल. स्त्री जमात चाणाक्ष नसती तर तिने शेतीचा शोध कसा लावला असता? तिच्या अंगात शक्ती नसती तर तिने नऊ महिने गर्भ पोटात सांभाळूच शकली नसती. घरात एकटीच असलेली बालिका, रात्रीची डयूटी संपवून घाई घाई घरी जाणारी स्त्री यांच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन बलात्कार करणा-यांना नियंत्रणात आणण्याऐवजी सर्व स्त्री जमातीलाच घरात, पदरात, बुरख्यात झाकून टाकण्याचा पुरुषसत्ताक समाजाचा डाव आपण समजावून घेतला पाहिजे. त्याबरोबरच प्रत्येक पुरुष हा स्त्रीवर अत्याचार करण्यासाठीच जन्मला आहे ही भिती मुलींच्या डोक्यात घालता कामा नये यासाठी आपण काम करायला हवे. मुलांनी रस्त्यात छेडले तर काय करावे यासंबंधी मुलींशी मोकळेपणाने चर्चा करावी, म्हणजे त्या स्वतःच स्वतःचे संरक्षण करू शकतील. या ऐवजी या रस्त्याने जावू नको असे सांगून हळूहळू स्त्रीयांच्या संचार स्वातंत्र्यावर (mobility) गदा आणली जाते हे


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....३५