पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ६. १९७५ ते १९९५ :- १९७० च्या दशकात जगभर झालेल्या स्त्रीवादी चळवळीचा परिणाम आणि आताच आपण वरती पाहिलेल्या चळवळीमुळे निर्माण झालेलं वातावरण यामुळे भारतात 1975 ला स्त्रीवादी चळवळ अधिक जोमाने सुरू झाली. हया चळवळीमुळे स्त्री एक व्यक्ती आहे. देशाची नागरिक म्हणून तिच्यावर झालेले अन्याय

म्हणजे मानव अधिकाराचे उल्लंघन आहे' ही भूमिका मूळ धरू लागली. या काळात उच्चवर्णीय का होईना पण स्त्रीयांच्या चळवळीला स्त्रीयांचे नेतृत्व मिळाले. त्यामुळेच स्त्रीयांचे प्रश्न हे स्वतंन्नपणे हाताळले पाहिजे हा विचार रूजला. एकत्र समाज कल्याण खात्यातून स्वतंन्न महिला व बाल कल्याण विभाग निर्माण होणे हा त्याचा परिपाक आहे. देशाच्या उत्पन्नात स्त्री जर तिच्या श्रमाने सहभाग देत असेल तर त्या उत्पन्नात तिचाही तितकाच वाटा आहे, तो वाटा कल्याणाच्या नावाने न देता विकासासाठी आवश्यक म्हणून अधिकृत दिला जावा हा विचार समाजाला समजवण्यात चळवळीला आपली शक्ती, वेळ खर्ची करावा लागला आणि शेवटी महिला व बाल विकास विभाग आणि त्यासाठी निश्चित तरतूद होऊ लागली.

 1970 साली जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धते साठी तसेच महागाई विरोधात मोठया प्रमाणावर स्त्रियांच्याच नेतृत्वाखाली मध्यमवर्गीय आणि झोपडपट्टीतल्या स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. 1972 साली शहादयात झालेल्या दारूबंदीच्या आंदोलनात सहभाग घेऊन स्त्रियांमधले धाडस सत्तेला दिसलं. साधारण त्याच दरम्यान अहमदाबादच्या इलाबेन भट यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या कष्टकरी स्त्रियांच्या 'सेवा' को ऑप मुळे आता स्त्रियांना मताबरोबर पतही मिळू लागली. 1975 ते 85 च्या दशकात स्त्रीयांच्या देशातल्या स्थितीचा अभ्यास करून देशाने 'श्रम अहवाल प्रसिद्ध केला. आमच्याकडे तर आम्ही तिला देवी मानतो म्हणजे सर्वकाही अलबेल आहे हा तोपर्यंत पिटला जाणारा डिंगोरा बंद झाला आणि स्त्रियांची आजची विषमतेची, वंचिताची स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. याच काळात 1976 ला समान कामाला समान वेतनाचा कायदा अस्तित्वात आला.

 1980 ला मथुरा आणि माया त्यागी केस गाजल्या. ज्यामुळे कस्टोडियल रेप ही महत्वाची संकल्पना कायद्यामध्ये मान्य करण्यात आली. तोपर्यंत स्त्री ज्याच्या ताब्यात त्याला तिच्याबरोबर कसाही व्यवहार करायला जणू परवानगीच मिळाली होती. 1985 मध्ये शहाबानो केसच्या निमित्ताने मुस्लिम महिलांचे प्रश्न ऐरणीवर आले. तोपर्यंत स्त्रियांचे प्रश्न हे राजकिय प्रश्न आहेत हयाला समाजमान्यता मिळायला लागली होती. शहाबानोच्या केसने मुस्लिम स्त्रीयांचे प्रश्न फक्त त्यांच्या धर्माचे किंवा फक्त 'त्यांचे' प्रश्न कसे?हा जाब चळवळीने विचारला. या केसच्या निमित्ताने मतांच्या राजकारणासाठी धर्म वेठीला धरून स्त्रियांचा बळी देण्याचा प्रकार उघडकीस आला आणि स्त्री कुठल्याही धर्माची असली तरी तिच्यावर होणारा अन्याय हा सर्व स्त्रियांवरचा अन्याय असेल ही भगिनीभावाची बांधिलकी चळवळ मानते हे पुन्हा एकदा स्पष्टपणे समाजापुढे मांडण्यात आले.


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....२०