पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जी पहिली शिक्षित पिढी तयार झाली तिच्या मनात स्वातंत्र्याच बीज पडल आणि अन्यायाला जाब विचारणारी पिढी निर्माण झाली. त्यानंतरच्या काळात मोठ्या प्रमाणावर पुरूष समाज सुधारकांकडून स्त्रीयांवरिल अन्याय अत्याचार करणा-या रिती रिवाज, रूढी-परंपरांविरूद्ध चळवळ उभी करण्याचा प्रयत्न झाला. मग राजाराम मोहन रॉय यांची सती बंदीसाठीची चळवळ असो अथवा महर्षि कर्वे यांची स्त्री शिक्षणाची चळवळ असेल

५. स्वातंत्र्य चळवळ ते आंबेडकरी चळवळ :- स्वातंत्र्यापूर्वीच्या स्त्री शिक्षणासाठी झालेल्या चळवळीमुळे तसेच महात्मा गांधी यांच्या डोळस नेतृत्वामुळे मोठया संख्येने स्त्रीया स्वातंत्र्य आंदोलनात मग ते विधायक काम असेल अथवा संघर्षात्मक काम असेल त्यात सहभागी झाल्या. त्या चळवळींमुळे डॉ.अॅनी बेझंट, विजयालक्ष्मी पंडित, सरोजिनी नायडू, इंदिरा गांधी यांसारख्या धुरंधर नेत्या देशाला लाभल्या.

 स्वातंत्र्य चळवळीच्या बरोबरीने मोठया संख्येने स्त्रीया रस्त्यावर उतरल्या, आंदोलनात सहभागी झाल्या त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत की, समाजात स्त्रीला अतिशूद्र समजल जातं, तिला एकाच वेळेस वर्ण-वर्ग-जात-धर्म आणि लिंग यासर्वच विषमतांचा परिणाम भोगावा लागतो. स्त्री आणि दलितांचे दुःख सारखे आहे. म्हणून त्या दोन्हीही चळवळीचे उद्दिष्ट, धोरणं सारखी असावी असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मानत. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक आंदोलनात जाणिवपूर्वक स्त्रियांसाठी विशेष कार्यक्रम घेतले जात. भारतातल्या जाती अंताच्या चळवळीत सवर्णाच्या मानसिकतेत बदल व्हावा यासाठी जेवढे प्रयत्न चळवळीव्दारे केले गेले, तेवढेच किंवा त्यापेक्षा अधिक प्रयत्न दलितांना जे या शोषणाचे बळी होते त्यांना जागृत करण्यासाठी, गुलामगिरी नाकारायला तयार होण्यासाठी

बाबासाहेबांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत, एकदा का गुलामाला त्याच्या वरील गुलामगिरीची जाणिव झाली की तो त्याविरूद्ध बंड करून उठेल' दलितांना हया बंडासाठी तयार करण्यात इतके व्यस्त असूनही त्यांनी सर्व स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल' सारखे पर्याय निर्माण केले. शोषणाच्या मूळावर घाव घालण्यासाठी मनुस्मृतीच दहन केले.

 बाबासाहेब स्वतःला महात्मा फुले. सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा, राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार मानत होते म्हणूनच त्यांनी घटनेचे शिल्प साकारतांना स्त्रियांसाठी अनेक कायदे, अधिकार यांची तरतूद करून त्यांच्या आदर्शानी सुरू केलेली स्त्रीवादी चळवळ अधिक सक्षमपणे पुढे नेली. ज्या स्त्रीने दुर्बलतेचे, विषमतेचे दुःख भोगले आहे, ती जेव्हा स्वतःच्या स्वातंत्र्याची, विकासाची गोष्ट बोलते तेव्हा स्वतः साठी तर हे सर्व ती मिळवेनच पण दुस-यावर अन्याय, अत्याचार होणार नाही याचीही काळजी घेईन हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाकित पुढे स्त्रीवादी चळवळीचा प्रवास पाहिला तर सिद्ध होताना दिसते.


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१९