पान:लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असलं पाहिजे हा पायंडा पाडला. या स्त्रियांचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, या स्त्रिया स्वतः कर्तृत्ववान होत्या पण त्यांच कर्तृत्व सिद्ध होण्यासाठी त्यांच्या कुटुंबात काही ना काही घटना घडल्या, ज्यामुळे त्यांना या नेतृत्वाच्या जबाबदारीला स्विकारावे लागले.

 ऐतिहासिक कालखंडाचा अभ्यास आपण केला तर लक्षात येईल की, सत्तेचा किंवा राज्याचा जास्तीत जास्त वेळ हा ती सत्ता टिकवणे, त्यासाठी आक्रमण करणे किंवा झालेले आक्रमण परतवून लावणे यातच गेलेला दिसतो. याकाळात राजाच्या राणीला किंवा त्या कुटुंबातल्या स्त्रियांना प्रतिष्ठा होती, त्याच वेळी लढाईच्या मैदानात मात्र हारलेल्या राज्यातल्या स्त्रियांना पळवून नेण्याची प्रथा होती. यात कोणाला काही गैरही वाटत नव्हते. शिवाजी महाराज या सर्व पार्श्वभूमिवर अत्यंत महत्वाचे वाटतात कारण त्यांनी लढाई जिंकल्यानंतरही कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून तिच्या राज्यात मानमरातब ठेवून परत पाठवली. याकाळात एकापेक्षा अधिक स्त्रियांशी लग्न करणे किंवा विवाहा बाहेरही नातं विकसित करणे ही प्रथा होती अशा स्त्रियांना अंगवस्त्र म्हणत.

४. स्वातंत्र्यापूर्वी :- 'स्त्री-पुरूष तुलना हा निबंध लिहिणा-या ताराबाई शिंदे, पूर्व प्राथमिक शिक्षणाची कल्पना भारतात आणून आदिवासी पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवणा-या ताराबाई मोडक, उच्चवर्णीय तसेच पुरूषी वर्चस्ववादी मानसिकतेला नकार दिला म्हणून जेल भोगून शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या रखमाबाई, डॉ.आनंदीबाई जोशी या टप्यावर चळवळ एका एका व्यक्तीच्या प्रयत्नांनी सुरू होऊन त्याचा एक समुह होताना दिसतो. याकाळात उभं राहिलेलं सावित्रीबाई फुलें सारख नेतृत्व स्वतःच्या आशा आकांक्षेच्या पलिकडे समुहाच्या आकांक्षेसाठी आग्रही असताना दिसते. त्यामुळेच त्यावेळी अशक्य वाटणा-या स्त्री शिक्षणासारख्या गोष्टीही पुढे शंभर वर्षांनी का होईना त्याचा प्रवाह जनमानसात रूजलेला दिसतो, त्याचा राजमार्ग होताना पाहू शकलो पेशव्यांच्या काळात तर संरजामी व्यवस्था होती सत्ता टिकवण्यासाठी प्रत्येकावर संशय ठेवून राज्य चालविण्याची प्रथा होती. जनानखाने बाळगणे यात पेशव्यांना विशेष

पुरूषत्व वाटायचं, त्यामुळे लढाईला जातांना शस्त्र सामुग्री बरोबरच जनानखाने नेण्याची पद्धत होती. या जनानखान्यातच रमल्यामुळे पेशव्यांनी लढाई करून सत्ता मिळवल्याची उदाहरणे फारच दुर्मिळ आहेत. जास्तीत जास्त वेळा तह करूनच त्यांनी आपला जीव वाचवला आहे. ज्यांचा स्वतःचा जीव धोक्यात होता तिथं नविन विचार रूजवण्याचा प्रश्नच येत नाही म्हणून या काळात आहे त्या रूढी परंपरा टिकवण्याचे काम झालेले दिसते. त्याबरोबरच विधवा केशवपन, सती सारख्या प्रथांच उदात्तीकरण होताना दिसतं.

 यानंतरच्या काळात इंग्रजांची सत्ता आल्यानंतर त्यांना कारकून हवे होते म्हणून का होईना त्यांनी इथल्या उच्चवर्णीय पुरूषांसाठी शिक्षण आणले ज्याचा परिणाम म्हणून


लिंग पद समभाव (जेंडर) आणि कौटुंबिक हिंसाचार.....१८