पान:लाट.pdf/67

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तुम्ही द्यायचा! तुमच्या लेखणीनं! तुमच्या कलेनं! ते सोडून, तुम्हीच रखडत बसता हे आश्चर्य आहे!"
 महंमद ज्वलंत आशावादाचा नमुना आहे. मला त्याचं म्हणणं कळतं. मी त्याला समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे.
 मेघाही भेटतेच आहे. एकदा चौपाटीवर मला भेळ खायचा तिनं आग्रह केला. भेळ, भजी असलं मी खात नाही. क्षयासारख्या चिवट रोगाबरोबर सामना देताना असल्या पथ्याची आयुधं बाळगायला हवीतच. पण ती म्हणते, "तुझ्या लिहायच्या रोगाला हे फार चांगलं टॉनिक आहे हं! थोडंसं खा म्हणजे लिहायला बघ कशी स्फूर्ती येईल ती!"
 "मला माझी प्रकृती संभाळायला हवी. एका रोगाचं जे टॉनिक तेच दुसऱ्या रोगाचं पथ्य आहे, त्याला काय करू?"
 तिच्या आग्रहाखातर थोडी भेळ खातो. ती हसून विचारते, “हा लिहायचा रोग तुला आधी लागला की क्षय आधी झाला?"
 "कुणास ठाऊक? साहित्याचा रोग लागल्यावर क्षय झाला असेल किंवा क्षय झाल्यामुळेदेखील साहित्याचा रोग लागला असेल! बाकी या दोन रोगांचा एकमेकांशी दाट संबंध आहे खरा! तरी बेहत्तर, आणखीन एक रोग अद्याप लागलेला नाही म्हणून! चौपाटीवरील भेळीशी त्याचा दाट संबंध!"
 माझ्या बोलण्यावर ती तोंड भरून हसते आणि एकदम दचकते. कोणीतरी ओळखीचा माणूस अचानक प्रकटतो. ती सावरून त्या माणसाचं स्वागत करते. माझी ओळख करून देते. लेखक-उदयोन्मुख लेखक म्हणून! तो नाक मुरडून विचारतो, "काय करता?"
 मी काळवंडून जातो. मेघाच मग मला सावरते, त्याला आर्जवानं म्हणते, “यांच्यासाठी कुठं काम बघा ना."
 तो उपेक्षेने हसून उत्तरतो, “यांना काय करायचं आहे काम? बसायचं आणि लिहायचं! घरबसल्या पैसा कमवायचा. बरंय येतो. नमस्कार!” आणि तो निघून जातो. गर्दीत अदृश्य होतो.
 मेघा मला सांगत असते, "हे आपल्याकडचे जोशी. मुंबईत यांचे चार बंगले आहेत. बडी असामी आहे हो!"

 एवढा वेळ आवरून धरलेला माझा संताप अनावर होतो. उसळून येतो. मी देहभान विसरतो. सभोवतालची माणसं जणू नाहीशी होतात. शेजारची मेघाही अदृश्य होते आणि जोरजोरात ओरडतो, “आग लाव त्या चार बंगल्यांना! आम्हाला नको काही काम! नको पैसा! आम्ही उपाशी राहू, आमच्या इच्छा-आकांक्षा मारून जगू, पण जगू! महंमद म्हणतो ते खरं! यापुढं नुसते जगणार नाही! इतरांनाही कसं जगायचं ते शिकवू. तुम्ही राहा ऐषआरामात. दौलत कमवा! जग खरेदी करा! पण पुढं काय? पृथ्वीवरचे चार तुकडे तुमच्या मालकीचे असतील! पण हे अवघं विश्व आमचं आहे. त्यातल्या त्या चमकणाऱ्या दूरदूरच्या चांदण्या अन् तारे हे आमच्या प्रतिभेचे खेळ आहेत. अनंत काणेकरांनी कुणालासं उत्तर दिलं

बेकार (पण कलावंत) माणसाची गोष्ट । ५९