पान:लाट.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतं, 'आम्ही सुखदुःखांचे कारखानदार आहोत!' तेच खरं! आम्ही तुमच्या सुखदु:खांचे कारखानदार आहोत! होय! सुखदु:खांचे कारखानदार!!"
 मेघा हलवते तेव्हा मी भानावर येतो. सभोवतालची चार माणसं माझ्याकडे टक लावून पाहत असतात. मी शरमतो. मेघा हळूच पुटपुटते, “मला लाजल्यासारखं झालं. हा मध्येच झटका कुठनं आला तुला?"
 “भेळ खाल्ल्याचा परिणाम!" मी हसून उत्तरतो, "आमच्या महंमद पैगंबरला जेव्हा ईश्वरी संदेश येत तेव्हा म्हणे असाच बेशुद्धीचा झटका येई. परमेश्वर त्याच्या तोंडून कुराण वदवी! इतर लोक ते मग काळजीपूर्वक टिपून घेत. मी आता जे बडबडलो ते तू लिहून नाही घ्यायचं?"
 ती मोठ्यानं हसते, मग मी कडवट स्वरात तिला विचारतो, “तू काय म्हणालीस मघाशी? तुला लाज वाटली, नाही का! पण मी असाच वागणार! माझ्या दुर्दशेला कंटाळून कित्येकांनी माझी संगत सोडली. आता तुम्ही दोघं-तिघं राहिलात. तुम्हीही मला नाही हाक मारलीत तरी हरकत नाही. मी एकटा राहीन. एकाकी या परिस्थितीशी लढेन!"
 तिला ते ऐकून अत्यंत वाईट वाटतं. मला ती समजावण्याचा प्रयत्न करते, "असं काय बोलतोस? तुझ्याविषयी मला आदर वाटतो. अभिमान वाटतो. माझ्या वर्गातला तू! माझ्या गावचा! तू मोठं व्हावंस! खूप मोठं व्हावंस! मोठ्ठा लेखक व्हावास असं वाटतं. तुला खोटं वाटतं माझं म्हणणं?" आणि तिचं बोलणं संपल्यावर मी जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा तिचे डोळे पाण्यानं तरारलेले मला दिसतात.
 मेघा फारच हळवी आहे. पण माझी वर्गमैत्रीण आहे. तिचा स्वभाव आता माझ्या अंगवळणी पडला आहे. हा दोष सोडला तर तिच्या गुणांना मोल नाही. तिचं भलं होवो, असं मी मन:पूर्वक इच्छितो.

 मी तिची मग समजूत घालू लागतो. माझा आवाज चढू लागतो आणि ती माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकू लागते, "कधी कधी मला ही नामुष्की सहन होत नाही मेघा, मग मी चिडतो. आतल्या आत धुमसू लागतो. मनात नाना विचार येतात आणि त्यांनी पेटून निघतो. स्वत:च्या दुबळ्या मनोवृत्तीची लाज वाटू लागते. अग, काय आपला हा मध्यमवर्गाचा अध:पात! एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजच्या पट्टेवाल्यानंदेखील आम्हाला दरडवावं आणि आम्ही मुकाट्यानं बाजूस सरावं! त्या पट्टेवाल्यावरही कदाचित अशी अवस्था येईल याची त्याला जाणीव देऊ नये? आमच्यावरील अन्यायाची आम्हाला अगदीच कशी ग चाड नाही? कशाला आमचे हे लोक राज्य करताहेत? राष्ट्रातली कर्तृत्ववान पिढी अशी विफलतेनं भारावली गेली आहे. तिला कार्यप्रवृत्त करण्याचं ज्यांना त्राण नाही ते राज्य करायला नालायक आहेत! पण आम्ही स्वस्थ का? आम्ही जनजागृती का करीत नाही? समाजाला आशा, धीर का देत नाही? आम्ही कलावंत ना? केवढी प्रचंड जबाबदारी आहे आमच्यावर? विफलतेने ग्रासलेल्या हजारो लोकांच्या कर्तृत्वाचा साठा झाला, आमच्या ज्वलंत साहित्याचं सरपण त्याला मिळालं तर केवढा प्रचंड स्फोट होईल! प्रचलित समाजव्यवस्था कोसळून पडेल. नवी...नवी...

६० । लाट