पान:लाट.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तिची धाकटी चुलत बहीण मध्येच बोलते, “बेबीताईनी सीऽनीमा बघितला बरं काऽ!'
 "होऽय काऽ?" मीही तिला वेडावतो. पण तेवढ्यावरच गप्प बसणारी ती मुलगी नव्हे! हातवारे करीत ती पुढं विचारते, “काहो हमीदभाई? तुमची दाऽढी का वाढली आहे? पैशे नाऽयत होऽय?'
 मला संताप येतो. "मूर्ख आहेस!" मी ओरडतो. पण मेघा मला आवरते, 'गप रे! नाही तर उगाच गळ्यात यायचं..."
 अंधार पडायच्या आधी आम्ही उठतो. त्या गिरगावात जातात. मी जोगेश्वरीला परततो.


 मेघानं दिलेले पैसे संपायला वेळ लागत नाही. फारतर दहा-बारा दिवसच निघतात. पुन्हा निष्क्रिय दिनक्रमाचं चक्र सुरू होतं. आणि तेच खरं सुखकारक ठरतं. कुठं जायला-यायला नको. कुणाला भेटायला नको. लाथा आणि शिव्या खायला नकोत. कोणी आगंतुकपणे भेटण्याची धास्ती करायला नको.
 आणि अगदीच बसणं असह्य वाटू लागलं की, थोरल्या भावाजवळ पैसे मागण्याचा मी बेत करू लागतो. तो पक्का ठरायला दोन दिवस जातात आणि मागण्याइतपत मानसिक तयारी व्हायला आणखीन दोन दिवस! अशा रीतीनं चार दिवसांनी मी मागतो, "मला दोन रुपये हवेत."
 तो काही न बोलता पाचाची नोट पुढं करतो. मी भकास मुद्रा करून बावळट हसतो आणि तिथून उठतो...
 मग दिनचक्र बदलतं. पुन्हा एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज! अ० रझाक बोहल्याचं संदर निवासस्थान! त्याची तिरस्कारपूर्ण दृष्टी आणि त्याच्या पोरीची प्रेमात नजर! आणि दोघांची दृष्टी चुकवण्याचा माझ्या दृष्टीचा विचित्र लपंडाव सुरू होतो. त्याच्या शिव्या आणि तिचं लाघवी बोलणं सारख्याच मन:स्थितीत मी ऐकून घेतो.
 महंमद मग एखादं पिक्चर दाखवतो. त्यातले ते उत्तान प्रणयप्रसंग पाहून माझं डोकं फिरू लागतं. मी मध्येच त्याला म्हणतो, "पुरे झालं, चल घरी जाऊ!"
 तो माझ्यावर उखडतो. "तुझं आताशा मन ताळ्यावर नाही. तुला होतंय तरी काय?"
 "काही नाही! या जीवनात काहीच अर्थ नाही असं मला वाटू लागलंय!"
 "गाढव आहेस!" तो म्हणतो, "तुझ्यासारख्या माणसाला ही असली विफलता शोभत नाही!"
 "जिंदगी तल्ख हुवी! जीनेसे बेजार हुवे!" मी मध्येच कुठल्या तरी गाण्याचा चरण झोकून देतो!

 "अरे! सगळ्यांचंच जीवन असं भग्न झालेलं आहे! आपण सारेच एका संक्रमणकाळाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. जनी श्रद्धा पार धुळीस मिळाली आहे. विलक्षण गंभीर आर्थिक परिस्थितीनं सगळीच गांगरून गेली आहेत. एक विचित्र, भयानक पोकळी अवघ्या जीवनात निर्माण झाली आहे. अशा वेळी समाजाला, राष्ट्राला, नवीन श्रद्धा, नवा धीर

५८ । लाट