पान:लाट.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सगळ्यांना वाटू लागलं.
 संध्याकाळचा म्हारकीचा म्हार गावभर ओरडत गेला, “आज रातरी गावकीची बैठक सालंमंदी बसायची हाय होऽ..."
 रात्रीची जेवणं झाल्यावर दरोबस्त घरांतील पुरुषमंडळी शाळेकडे निघाली. रात्रीचे पहाऱ्यावर असलेले निवडक जवान मात्र गस्त घालण्यासाठी निघून गेले. बाकीचे शाळेपाशी जमा झाले. दोन गॅसबत्त्या शाळेत भकभकू लागल्या. आपल्यावर काही तोहमत येते की काय म्हणून चिंतातुर झालेले म्हार कोंडाळं करून एका बाजूला बसले. जमावानं आलेली कुळवाडी मंडळी दुसऱ्या बाजूला बसली. राव मंडळीही येऊन बसली. ब्राह्मण नि मुसलमानही जमा झाले. कासमखान हातातली काठी टेकीत आले आणि बैठकीत मध्येच बसले.
 ते येऊन बसले तेव्हा कोणी तरी येऊन त्यांच्या कानाला लागून म्हणाला, "अन्ना अजून नाय अयलो तो?"
 "हो. तो येयालाच व्होवा. नाय तर एवरा करून फुकट व्हायाचा.” असं म्हणून कासमखानांनी म्हारकीच्या म्हाराला अण्णाला बोलवायला पाठवलं. म्हाराला त्यांनी सांगितलं, “अन्नाला म्हनावं, तुज्यामुलं बैठक खोटी हायली हाय."
 म्हार काही वेळानंच परत आला. अण्णानं सांगितलं होतं की, “मला बरं नाही. आज खोकला जास्तच करतोय. मी यायला हवा का? तसं असल्यास पुन्हा येऊन कळव म्हणजे येतो."
 म्हारानं हा निरोप येऊन सांगताच कासमखान मनातल्या मनात हादरले. अण्णा शंभर टक्के गुन्हेगार आहे असं त्यांचं मन त्यांना सांगू लागलं. ते जोरानं किंचाळले, “यायलाच हवा म्हंजे काय? यायलाच पायजे! हा बामण आमाला फसवायला बगतो काय?"
 म्हार पुन्हा अण्णाला बोलावण्यासाठी गेला आणि इकडे बैठकीत कुजबूज सुरू झाली. अण्णा का येत नाही? तो घरी तरी नक्की आहे का? सकाळपासून तो दिसला का नाही?
 तेवढ्यात कासमखानांनी एकेकाला शपथा घ्यायला सांगितल्यामुळे गलका कमी झाला. अण्णा न आल्यामुळे त्याच्या शपथेला एवढं महत्त्व आलं की, बाकीच्या लोकांच्या शपथांत कुणाला फारसा रस उरला नाही. इतरांच्या शपथांचा फार्स चटकन उरकला गेला.
 आणि मग अण्णा आला. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणं त्यानं मफलर गुंडाळला होता. त्याच्या हातात कंदील आणि काठी होती. त्याचे तीक्ष्ण घारे डोळे क्षीणपणे सगळ्या बैठकीवरून फिरले. शाळेच्या पडवीच्या भिंतीला असलेल्या खुंटीला हातातला कंदील टांगून त्यानं त्याची वात कमी केली. मग खोकून खोकून त्यानं बेडका बाहेर टाकला आणि खाकरत खाकरत आत येऊन तो कासमखानांच्या बाजूला येऊन बसला.

 त्याबरोबर सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखल्या गेल्या. गोंधळ कमी झाला. लोक एकदम शांत झाले. अण्णानं संथपणे एकदा साऱ्यांवरून आपली दृष्टी फिरवली आणि तो विडी पेटवून तिचे झुरके मारू लागला. एक प्रकारची उत्सुकता, विचित्र कुतूहल सगळ्यांच्या

तळपट । ४५