पान:लाट.pdf/54

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मनात एव्हाना निर्माण झालं होतं. आता पुढे काय होणार याचा कुणालाच अंदाज येत नव्हता. तोच कासमखान अण्णाला म्हणाले, "अन्ना, सगल्यांच्या शपता घेऊन झाल्या. आता तुजी होऊ दे."
 पण इतरांप्रमाणे अण्णाला सरळ शपथ घ्यायला लावायची हा बेत हैदरला पसंत पडला नाही. तो एकदम ओरडला, “नाय-तसा नाय! जरा थांबा मामू. माजा तुमाला अपोज हाय!"
 आपल्या बोलण्यात मधून मधून इंग्रजी शब्द आणण्यासाठी हैदर नेहमी धडपडत असे आणि असलं काही तरी बोलून जात असे. आधी "सपोर्ट'ला तो “सपोज' म्हणत असे, आणि सपोज नि अपोज या शब्दांची अशी उलटापालट करून टाकीत असे. त्यामुळे त्याला काय म्हणायचे आहे ते अनेकदा ऐकल्यामुळे लोकांना कळून चुकलं आणि गंभीर होत गेलेल्या त्या बैठकीतली काही पोरं खदखदा हसली!
 त्यांना दरडावून कासमखानांनी हैदरला विचारलं, “काय म्हनना हाय तुजा?"
 जमलेल्या मंडळीकडे तोंड करून हैदरनं आपल्या 'सुद्ध' भाषेत, अण्णाला आपण रात्री कुठं नि कसं पाहिलं ते सांगितलं. बैठक आता अधिकच गंभीर झाली.
 आणि हे ऐकून अण्णा मात्र दचक्यानं काळाठिक्कर पडला! आपल्यावर सरळ सरळ असा कोणी आरोप घेईल अशी त्याला सुतरामदेखील कल्पना नसावी. हैदरचं बोलणं संपताच तो उठून उभा राहिला. संतापाने तो थरथर कापू लागला. आपल्या सवयीप्रमाणे आधी तो खोक खोक खोकला. मग बाहेर जाऊन त्याने पचकन बेडका टाकला आणि आत येऊन खोकत आणि खाकरत तो ओरडला, "रांडेच्यांनो! माझ्यावर खोटे आळ घेता काय? रात्री मी घराबाहेर पडलो होतो खरा, पण माझ्या कामाला मी बाहेर पडलो होतो. पावट्यात रात्रीची कुणाची तरी गुरं येतात म्हणून मी शेतावर खेप टाकली होती.”
 स्तब्ध झालेले लोक अण्णाचं बोलणं ऐकत होते. हैदरला यावर काही उत्तर देता आलं नाही. त्याला उत्तर देण्याची जरुरीच नव्हती. अण्णा रात्री घराबाहेर पडला होता, आपल्या शेतावर गेला होता, ही गोष्ट त्याच्याच तोंडून शाबीत झाली होती. आणि त्याच्या शेतावर जाण्याची वाट आहमद खोताच्या पेंढ्यांच्या उडवीजवळूनच जात होती.
 तेवढ्यात सखारामराव उठून म्हणाले, "पण अन्नाला शप्पत घेयास सांगावी."
 "हो. शप्पत होवंद्या. अन्नाची शप्पत होवंद्या!" असा सगळ्या मुसलमान खोतांनी गलका केला.
 ते बघून अण्णा उभ्या उभ्याच बोलला, "सगळ्यांच्याबरोबर आग विझवायला मी पण होतो. मला बरं नव्हतं तरी मी जातीनं खपलो. त्यानं मला त्रास झाला. आज सकाळी उठवेना, म्हणून मी कुठं बाहेरही पडलो नाही. पण तुम्हाला माझाच संशय असेल तर मी शपथ घेतो. हो! कर नाही त्याला डर कशाला?"

 "आम्हाला बारा गोष्टी नको सांगूस! शप्पत घे! पयल्यानं शप्पत घे!" असं पुन्हा सगळे मुसलमान खोत ओरडले. तेव्हा अण्णानं कासमखानांच्या पुढ्यातला नारळ उचलून हातात घेतला आणि उभ्याउभ्याच तो मोठ्यानं म्हणू लागला,

४६ । लाट