पान:लाट.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 त्याबरोबर सगळे जण चपापून हैदरकडे बघू लागले. त्यानं सांगितलेला हा तर्क खरा असेल का, याची आपापल्या मनाशी ते शहानिशा करू लागले.
 रात्री आपण आणि सखारामराव असे दोघे बामणवाडीवरच पहाऱ्यावर होतो, रात्रीच्या दहाच्या सुमारास अण्णा हातात काठी घेऊन खोकत खोकत दुकानाच्या दिशेनं गेला-असं हैदरनं पुढं सांगितलं.
 आणि सखारामरावांनीही याला दुजोरा दिला. ते म्हणाले, “आपुनसुद्धा अन्नाच्या खोकन्याचा आवाज वळखला."
 कासमखान हळूहळू विचार करू लागले. हळूहळू मागच्या काही गोष्टी त्यांना आठवल्या. गावातल्या हिंदू मुलांसाठी वेगळी, स्वतंत्र शाळा असावी म्हणून अण्णा काही महिन्यांपूर्वी खटपट करीत होता. गावातली शाळा मुसलमानांची होती म्हणजे मुसलमानांनी आपल्या खर्चाने बांधून काढली होती. पण सगळी गावातली मुलं त्याच शाळेत शिकत होती. अण्णाला हे नको होतं की काय?
 याहून दुसरी एक गोष्ट कासमखानांना अधिक महत्त्वाची वाटली. गावात दगड पडायला लागल्यावर रात्रीचा पहारा करण्याची सूचना कामसखानांनी केली, तेव्हाही अण्णानंच त्यांना विरोध केला होता. त्याचं म्हणणं असं होतं की, सबंध गावचा पहारा करण्याची काय जरुरी आहे? दरोबस्त वाडीवरल्या गड्यांनी आपापल्या वाडीच्या पहायचा बंदोबस्त करावा म्हणजे झालं.
 कासमखानांच्या मनात आलं, 'अण्णा खरोखर असा आहे काय? आग लावण्याच्या थराला तो जाईल काय?...कुणी सांगावं? धामधुमीचा, गडबडीचा वखत आहे-कुणाचाच भरंवसा देता येणार नाही...त्यातल्या त्यात या बामनाच्या जातीचा तर बिलकूल देता येणार नाही.'
 आलेल्या लोकांना त्यांनी विचारलं, "मग काय करावा म्हनताव?"
 यावर सगळ्यांच्या विचारानं असं ठरलं की, आज रात्री गावकीची बैठक घ्यावीच. गावातल्या रात्री पहाऱ्यावर नसलेल्या सगळ्या लोकांना आग तुम्ही लावलीत का म्हणून विचारावं, त्यांना शपथ घ्यायला लावावी. कसमा खायला सांगावं. अण्णा तिथं येईलच. तो शपथ घेतो की नाही, यावरून खरं-खोटं काय ते कळेलच.
 सगळ्यांना ही युक्ती पसंत पडली. कासमखानांच्या नावानं रात्री शाळेत बैठक घेण्याचं ठरलं. मग ते लोक निघून गेले.
 रात्रीच्या प्रकाराची घरोघर चर्चा चाललेली होतीच. अल्पावधीत कसं कुणास ठाऊक, त्या प्रकाराशी संबंधित म्हणून अण्णाचं नाव सर्वतोमुखी झालं.

 अण्णा नेहमी सकाळच्या प्रहरी मुसलमानवाडीवरून आपल्या शेतावर जात असे. परतताना वाटेतल्या कादिर खोताच्या दुकानावर तो थोडा वेळ बसे आणि मग घरी जाई. पण त्या दिवशी सकाळी अण्णा शेतावर गेलेला कुणाला दिसला नाही. ही गोष्टदेखील संशयास्पद ठरली. यावरून रात्रीच्या बैठकीत अण्णाची कारवाई उघडकीस येणार असंच

४४ । लाट