पान:लाट.pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 दुसऱ्या दिवशी सकाळी मुसलमानवाडी जागी झाली ती रात्रीच्या आगीच्या प्रसंगानं भेदरलेली! उजाडताच उडवीपाशी पुन्हा लोकांचा घोळका जमला. दिवसाच्या उजेडात जळक्या उडवीचं, पेंढ्यांचं दृश्य भकास दिसत होतं. लोक रात्रीसारखेच तिथे कुजबुजत उभे राहिले. मग त्यातले चार लोक निघाले आणि कासमखानकडे गेले.
 कासमखान गावचे सरपंच. महिन्यापूर्वी महाडला दंगे झाल्यापासून गावात गस्त घालण्याची तजवीज त्यांनीच केली होती. कारण गावातलंही वातावरण विनाकारणच बिघडलं होतं. गावच्या एका बाजूस असलेल्या एखाद्याच्या घरी क्वचित दगड पडू लागले. दारं गदगदा हालवली जाऊ लागली. गंमत अशी की, गावातल्या कुठल्याही घरी हा प्रकार होऊ लागला. घरातली बायकापोरं रात्री-अपरात्री बोंबलत उठू लागली. महाडच्या दंगलीचा फायदा घेऊन गावात गुंडगिरी करण्याचा काही उपद्व्यापी लोकांचा हा बेत असावा, असं ठरवून गाववाल्यांनी एकजुटीनं रात्रीची गस्त घालण्याचं ठरवलं.
 या गोष्टीला महिना होऊन गेला. दगड पडायचे बंद झाले. बायकामुलांत पसरलेली भीतीही कमी झाली. जवान मुलं उत्साहानं, एकजुटीनं गस्त घालताना दिसू लागली. पण आज ही आग कशी लागली? सहज, चुकीनं लागली असेल काय? की कोणी जाणूनबुजून लावली? बाहेरून कुणी येऊन लावली काय? पण बाहेरून गावात येणाऱ्या दरोबस्त वाटांवर तर गस्तवाले जवान संध्याकाळपासून खडे होते-मग आग लागली कशी? कुणी गाववाल्यानं तर लावली नसेल?...
 अशा प्रकारे लोकांत कुजबूज चालली होती. सकाळपासून नाना अफवा उठत होत्या. अनेकांची नावं घेतली जात होती. विनाकारण नसते संशय लोकांना यायला लागले होते. म्हणून हे लोक कासमखानांकडे आले होते. आगीचा छडा त्यांनी लावावा, गुन्हेगार त्यांनी हुडकून काढावा, म्हणून त्यांना सांगण्यासाठी आले होते.
 त्यांचं हे बोलून झालं आणि मग काही वेळ स्तब्ध राहून कासमखानांनी विचारलं, “आहमदचा कुणाशी भांडनटंटा होता काय?"
 यावर सगळ्यांनी 'नाही' म्हणून माना डोलावल्या. कदाचित या गढूळ वातावरणाचा फायदा घेऊन एखादा वैरी आपलं वैर साधण्याची सहज शक्यता होती. पण या साध्या नि सरळ माणसाचं कुणाशी आणि कसलं वैर असणार होतं?
 त्यांनी 'नाही' म्हणताच कासमखान सचिंत झाले, त्यांनाही काही तर्क करता येईना. खरं म्हणजे तर्क करणं हे त्यांच्या हिशेबातच नव्हतं. असं काही असलं की कुणीतरी आपला तर्क बोलून दाखवायचा आणि त्यावर त्यांच्या पाठिंब्याचं शिक्कामोर्तब करायचं अशी गावांतली नेहमीची रीत होती.
 म्हणून त्यांनीच आलेल्या लोकांना विचारलं की, त्यांचा काय समज आहे? ह्या आगीच्या प्रकाराबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे?

 यावर प्रत्येकाने आपापले तर्क बोलून दाखवले. अखेरीस हैदर बोलला आणि त्यानं अण्णा बामणाचं नाव उच्चारलं.

तळपट । ४३