पान:लाट.pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तळपट


 रात्र पडली आणि गावात घरोघर फाणस लटकले. मग लोकांची जेवणं झाली. काही वेळानं गावात गस्त घालणारी पोरं घराघरांतून बाहेर पडून एकत्र जमली. टोळक्याटोळक्यांनी वाडीवाडीवर पांगली. घराघरांतून पेटलेले फाणस थोड्या वेळाने विझले. गाव काळोखात बुडाला. मशिदीतली बत्ती तेवढी तेवताना दिसत होती.
 दहा वाजता मुसलमान वस्तीत एकदम जाळ पसरलेला शाळेपाशी गस्त घालत असलेल्या मुलांना दिसला. थोड्याच वेळात काळसर धूर आकाशात वर वर चढताना दिसू लागला. आणि काही क्षणातच आगीचा भडका उडाला. लोळच्या लोळ दिसू लागले. त्याबरोबर मोठा आरडाओरडा सुरू झाला. रडण्याचे आणि किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. मोठा गलका झाला. सारा गाव गडबडून जागा झाला. विझलेले फाणस पुन्हा घरोघर पेटले. आगीच्या दिशेने गाव लोटला.
 आहमद खोताच्या पेंढ्यांच्या उडवीला आग लागली होती. उडवी धडाधड आगीनं जळत होती. आगीच्या गरम धापानं जवळ जमलेल्या लोकांचं अंग शेकून निघत होतं. हसनखानचं पायबळ सूटन गेलं होतं. तो रडत होता; ओरडत होता. गावचे लोक त्याला समजावीत होते.
 जमलेल्या लोकांनी लगेच धावपळ केली, आणि खालच्या विहिरीला उपसा लावला. पाण्याचा मारा सुरू झाला. तमाम गाव आग विझवण्यासाठी धडपडू लागला. कधी घराबाहेर न पडलेल्या खोतांच्या बायकादेखील हंडे भरभरून पाणी आणून उडवीत ओतू लागल्या. गावातला जवान आणि जवान आगीशी झुंज खेळू लागला.

 बऱ्याच वेळानं आग आटोक्यात आली. हळूहळू वर येणारा धूरही मंदावला. जळका पेंढा उडवीपासून दूर सारण्यात आला. जमलेल्या सर्व लोकांनी आहमद खोताला दिलासा दिला. ते तिथंच उभे राहिले आणि झालेल्या प्रकाराबद्दल आपसांत कुजबुजू लागले. आग लागली कशी? कोणी लावली? असे तर्क सुरू झाले. अनेकांच्या अनेक शंका सुरू झाल्या. तेवढ्यात कुणीतरी ओरडून म्हणालं, "याची चवकशी होया हवी." पण बाकीच्या लोकांनी त्याला गप्प केलं. गस्त घालणारी तिथं जमलेली पोरं भयभीत पण सावध चित्तानं पुन्हा गस्त घालण्यासाठी निघून गेली. जागा झालेला, तिथं गोळा झालेला गावही हळूहळू पांगला, आपआपल्या घरी गेला. पुन्हा गाव सामसूम झाला.

४२