पान:लाट.pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मिळणाऱ्या पैशाविषयी ती आम्हाला बेफिकीर दिसू लागली. नव्हे, त्याच्याकडून असल्या बिदागीची अपेक्षाच करीनाशी झाली. त्याच्या अस्तित्वाने अधिक खुलून जाऊ लागली आणि बरेच दिवस तो न फिरकल्यास चिंतातुर होऊन आम्हाला विचारू लागली, “शिवा कुठं आहे? बरेच दिवस येत नाही तो! तब्येतीने बरा आहे ना?"
 त्या दोघांचे संबंध हे असे गुंतागुंतीचे बनत चालले आणि इकडे आमच्या संबंधात हळूहळू बराच फेरबदल होऊ लागला. अझीम पूर्वीसारखा आमच्यात अधिक वावरेनासा झाला. समाजवादावरील त्याचा विश्वास उडाला...धर्मातीत राजकारण म्हणून काही एक चीज त्याला आकलन होईनाशी झाली. भारतावरील त्याची निष्ठा डळमळली... पाकिस्तानची निर्मिती मुसलमानांच्या उन्नतीकरिता आवश्यक असल्याबद्दल आता त्याची खात्री पटून गेली.
 इतक्या झपाट्याने त्याचे मतांतर होत गेले की तो आम्हाला भेटायचा बंद होऊन पाकिस्तानात कधी निघून गेला याची आम्हाला काही दिवस दाददेखील लागली नाही. कराचीहून त्याचे मला चार ओळीचे पत्र आले. तेव्हाच त्याच्या अचानक नाहीसे होण्याचे कारण आम्हाला कळून आले.
 त्याच्या या अत्यंत विसंवादी वर्तनाने मला धक्का बसला. शिवाला अत्यंत उद्वेग वाटू लागला. रायबा नुसता हसला. जणू असे कधी तरी होणार हे त्याला आधीपासूनच माहीत होते. परंतु त्याबद्दल काही विशेष वाटून घ्यायचीही त्याची तयारी नव्हती. माणसातली ही अतिरिक्त विसंगती त्याने पुरती समजून घेतली होती. आम्ही तडफडलो, अझीमला चार शिव्या घातल्या. त्याच्या मूर्खपणाला दोष दिला. परंतु तो काहीच म्हणाला नाही. आमचे बोलणे संपताच त्याने समारोप केला, “चालायचेच! त्यात एवढे वाटून घेण्यासारखे काहीच नाही. तो तसा कच्चाच होता. त्याला मते अशी नव्हतीच! राजकारणापासून काळीपर्यंत तो आपल्या मागे येत होता. परंतु आता त्याने येण्याचे नाकारले, एवढेच!'
 अझीमच्या विचित्र वागण्याचे त्याने केलेले हे विश्लेषण आम्ही आमच्या समाधानाखातर गृहीत धरून चाललो. परंतु काळीला मात्र ते शक्य झाले नाही. तो असा एकाएकी निघून गेला यावर आधी तिचा विश्वासच बसला नाही. परंतु शिवाने सांगितल्यानंतर तिला ते खोटेही म्हणता येईना. तो असा अचानक, न सांगता निघून जावा याचा तिला फार संताप आला. आपल्याला त्याने फसवले, वंचित केले असा तिने स्वत:चा समज करून घेतला. आम्ही सारेच कधी ना कधी असे अझीमसारखे अदृश्य होऊ असा तिच्या मनाने कयास बांधला. तिचे आमच्याशी वागणे बदलले. ती रूक्ष बनली. थंड्या वृत्तीने आमचे स्वागत करू लागली. आमचे अस्तित्व तिला फारसे जाणवेनासे झाले. आमची तिला विशेष पर्वाच वाटेनाशी झाली. आमच्याशी ती एकप्रकारे फटकूनच वागू लागली.

 तिच्या स्वभावातल्या या फरकाने रायबा चटकन सावध झाला. खरे म्हणजे तो पहिल्यापासून संतुष्ट नव्हताच आणि तिच्याशी असलेले आपले संबंध तोडून टाकण्याची संधीच शोधीत होता. ती त्याने यावेळी घेतली. तो तिच्याकडे जायचा मंदावला. जाईनासा

आम्हां चौघांची बाई । १०३