पान:लाट.pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झाला. तीदेखील एका अक्षराने त्याचा उल्लेख करीनाशी झाली.
 तिच्या या विक्षिप्त वागण्याची झळ शिवाला मात्र लागत नव्हती. तिने त्याचा सर्वच बाबतीत अपवाद केला होता. तो आपल्याला दगा देणार नाही, असा फसवणार नाही याविषयी तिला पुरी खात्री होती. त्याचे ती पूर्वीसारखे हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करीत होती. आणि रायबा तिच्याकडे यायचा बंद झाल्यानंतर तिच्या या रोषाचा धनी व्हायची पाळी माझ्या एकट्यावर आली.
 ते मलाही आवडले नाही आणि हळूहळू मीही तिच्याकडे जायचा बंद झालो. ते ऐकून रायबा मला म्हणाला, "बरे केलेस! तिच्या बाबतीत प्रथमपासूनच आपले चुकत गेले. परंतु अझीमने आपल्याला चूक सुधारायची संधी दिली. त्याच्यामुळे आपला केवढा फायदा झाला बघ! त्या किळसवाण्या प्रकारातून एकदाची स्वत:ची सुटका तरी करून घेता आली!
 पण शिवाला हे मानवले नाही. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही तिघे एकत्र आलो, तेव्हा तो आम्हाला म्हणाला, "काळीने तुम्हा दोघांना बोलावले आहे!"
 "ते कशाला बरे?' रायबा खेकसला, “पैसे कमी पडले काय?"
 "असतीलही!" मी म्हणालो, "पण त्याकरता आमची आवश्यकता आहेच असे नाही. तसे नसते तर तिने आमच्याशी असे घाणेरडे वर्तन केले नसते!"
 “तुम्ही लोकांनी तिच्याविषयी उगाचच चुकीची कल्पना करून घेतली आहे." शिवाने म्हटले, “अझीमने काही शिष्टाचार पाळायला नको होते? काही सभ्यपणा दाखवायला नको होता? आपल्याला विश्वासात घ्यायला नको होते?"
 "हवे होते ना! पण या साऱ्या गोष्टींशी तिचा फार कमी संबंध आहे." रायबा मध्येच म्हणाला. "का बरे? तिनं शिष्टाचाराची अपेक्षा करणं चूक कसं? आपण चौघांनी तिची जबाबदारी घेतली होती? आठवते?"
 "चांगले आठवते!" रायबा.
 “अझीमने ती मोडली नाही?" शिवा.
 "आणि तिने काय ती पाळली? ती आपल्या साऱ्यांशी सारखीच वागत होती? आमच्याशी असलेले तिचे संबंध आणि तुझ्याशी असलेले संबंध यात फरक नव्हता? अझीम गेल्यानंतरदेखील ती तुझ्याशी एकाच मापाने वागली?"
 रायबाच्या या प्रश्नांच्या भडिमाराला शिवाने लागलीच उत्तर दिले नाही. तो किंचित गंभीर झाला. मग काही वेळाने म्हणाला, “ती माझ्याशी वेगळी वागते हे मला मान्य आहे. पण त्याला दोन कारणे आहेत. एक तर मी तिला पहिल्यापासून, तुमच्या आधीपासून ओळखतो. आणि दुसरे म्हणजे तिला माझा विश्वास वाटतो. हा आपल्याला फसवणार नाही असे वाटते. तुमच्याविषयी तिला तसे वाटत नाही."

 "मग ठीक आहे." रायबा कोरड्या सुरात उद्गारला, "कटकटच गेली. विश्वास वाटत नाही म्हणजे मग प्रश्नच संपला."

१०४ । लाट