पान:लाट.pdf/110

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही नियम करणे आवश्यक होऊन बसले. याही बाबतीत शिवानेच पुढाकार घेतला. त्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काळीचे हे रहस्य आम्हा चौघांत गुप्त ठेवायचे, शक्यतो दुसऱ्या कुणा बाईकडे जायचे नाही, (बाई म्हणजे तिच्यासारखी बाई. दुसऱ्या 'चांगल्या' बाईकडे जायला मुभा ठेवण्यात आली होती!) तिचा सारा खर्च चौघांनी चालवायचा आणि चौघांखेरीज दुसऱ्या कुणाला सामील करून घ्यायचे नाही, असे आम्ही ठरवले.
 यातल्या काही बाबींना रायबाचा सक्त विरोध होता. विशेषत: दुसऱ्या बाईकडे न जायची कल्पना त्याला साफ नापसंत होती. मला तो म्हणाला, "हा साराच मूर्खपणा आहे. काळीला पोसत बसायची कल्पना काही माझ्या बुद्धीला पटत नाही. माझ्यापुरते विचारशील तर अशा सतरा बायांशी माझे संबंध असतात! ते मी सोडावेत किंवा त्यांना जन्मभर पोसत राहावे याला काय म्हणावे?"
 परंतु सामुदायिक जबाबदारीच्या तत्त्वांतून तो स्वत:ची सुटका करून घेऊ शकला नाही, शिवाच्या म्हणण्याला त्याला संमती द्यावीच लागली.
 या साऱ्या प्रकाराबद्दल आमच्या मनात मात्र कधी कधी एक प्रकारची उद्विग्नता निर्माण होऊ लागली. आम्ही चौघांनी एकत्रितपणे एका बाईशी गुप्त संबंध ठेवावेत हे माझ्या मनाला पटेनासे झाले. आमच्यासारख्या स्वातंत्र्यचळवळीतल्या लोकांनी आणि काही एक विशिष्ट राजकीय तत्त्वप्रणाली धारण करणाऱ्यांनी असे चारित्र्यहीनतेने वागावे ही कल्पना मनाला बोचू लागली. परंतु शिवाला माझ्या या शंका पटल्या नाहीत. समाजाकडे पाहण्याच्या दुबळ्या वृत्तीचे ते प्रतीक आहे असे त्याने प्रतिपादन केले. नैतिकतेची चुकीची मूल्ये स्वीकारल्याचा हा परिणाम आहे असे त्याने आमच्या निदर्शनास आणले. आणि त्याचे वैचारिक नेतृत्व आम्ही मान्य केले असल्यामुळे त्याचे हे प्रतिपादनदेखील आम्हाला बिनतक्रार मान्य करावे लागले.
 आम्हा सर्वांत शिवाच तिच्यावर अधिक खूष झाला होता. तिच्याकडे अत्यंत सहानुभूतीने पाहत होता. तिच्या अडचणीचे अत्यंत तत्परतेने निवारण करीत होता. तिच्या चांगुलपणाची तोंड भरून स्तुती करू लागला होता.
 परंतु तिच्याविषयी त्याच्या काही वेगळ्याच भावना आहेत असे आम्हाला मागाहून जाणवू लागले. एका सामान्य बाईपेक्षा ती काहीतरी वेगळी आहे अशा भावनेने तो तिच्याशी वागू लागल्याचे आम्हाला कळून आले. आमच्या तिच्याशी असलेल्या संबंधापेक्षा काही तरी वेगळे, नाजूक संबंध शिवा आणि ती यांच्यात प्रस्थापित झाले असावेत असा आम्हाला संशय येऊ लागला आणि रायबा शिवाच्या व तिच्या या नाजूक भावनांची आमच्यापाशी थट्टा करू लागला.

 परंतु या भावना केवळ एकतर्फी नसल्याचेही आमच्या हळूहळू लक्षात येऊ लागले होते. काळीच्या त्याच्याविषयीच्या कल्पनादेखील वेगळ्या होत्या. ती त्याच्या भावनांना नेहमी प्रतिसाद देत होती. आम्हा साऱ्यांशी ती एका विशिष्ट मापाने वागत होती; आमच्याशी शृंगार करीत होती आणि आमच्या पैशांची आपल्यापरी परतफेड करण्याचा प्रयत्न करीत होती. परंतु त्याच्याशी वागताना ती तेच माप सर्रास लावायला विसरत होती. त्याच्यावरून

१०२ । लाट