पान:लाट.pdf/109

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पूर्वीपक्षा तिचा नोकझोक बराच वाढला होता. काळ्या तुकतुकीत चेहऱ्यावर तिने उगाच सफेत पावडर थापली होती. त्यामुळे ती काहीशी विचित्रच भासत होती आणि कसले तरी भडक अत्तर अंगाला आणि सवंग तेल डोक्याला चोपडू लागली होती. तिच्याभोवती पूर्वीपेक्षा अधिक माणसेदेखील गोळा झालेली होती.
 “तिने जोरात धंदा सुरू केला आहे." अझीमनं तिथून परतताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
 “नव्हे! वाढवला आहे." मी म्हणालो.
 "काही का असेना-मला ती आवडली." रायबाने थोडक्यात आपले मत दिले; आणि शिवा काहीच म्हणाला नाही. परंतु तिच्याकडे पुन्हा जायला हरकत नाही असेच आम्ही साऱ्यांनी ठरवले आणि मग वारंवार जाऊ लागलो.
 तिच्याकडे आम्ही सतत जाऊ लागलो तेव्हा शिवाला तिच्या बऱ्याचशा गोष्टी खटकू लागल्या. ती तोंडाला फासत असलेल्या पावडरपासून अंगावरल्या वस्त्रांपर्यंत अनेक गोष्टींबद्दलची आपली नापसंती त्याने व्यक्त केली. तिच्याकडे इतर लोकांनी यावे, ही बाबही त्याला आक्षेपार्ह वाटू लागली.
 तिने कसे वागावे, कुणाशी संबंध ठेवावेत आणि कुणाला दूर ठेवावे याची आम्हाला फारशी क्षिती वाटत नव्हती. या बाबतीत काही गोष्टी आम्ही गृहीत धरून चालत होतो. तिच्या व्यवसायाला ते वागणे धरूनच होते. त्यात आक्षेप घेण्यासारखे काहीच नव्हते.
 परंतु या बाबतीत आम्हा तिघांतदेखील मतभिन्नता होती. अझीमची या बाबतीत ठाम मते नव्हती. त्याला ती कशीही असलेली, कशीही वागलेली चालण्यासारखी होती.
 तिने जरा नेटके, स्वच्छ राहावे, उगाच रंगरंगोटी करू नये, असे मलाही वाटत होते. परंतु या माझ्या मताचा आग्रह धरण्याची माझी इच्छा नव्हती. या बाबतीतले तिचे स्वातंत्र्य मी पूर्णपणे मान्य केले होते.
 रायबाची मते मात्र अगदीच वेगळी होती. तिच्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन वास्तववादी होता. एक भोग्य वस्तू या दृष्टीनेच तिच्याकडे तो पाहत होता आणि तिच्या व्यवसायाला धरून ती वागत असल्याचा निर्वाळा तो देत होता. या बाबतीत आपल्या कल्पना तिच्यावर लादणे म्हणजे स्वत:ला तिच्या अधिक निकट आणल्यासारखे होत असल्याचे त्याचे मत होते. “रांड ती!" तो उद्गारला होता, “तिने रंगरंगोटी करायची नाही तर काय आश्रमातल्या संन्यासिनीसारखे वागायचे?"
 तिच्याकडे जाण्याआड मात्र आमची ही मते कधी आली नाहीत. पण आम्ही तिच्याकडे वारंवार जात राहिलो आणि तिचेच वागणे हळूहळू बदलत चालले. तिने रंगरंगोटी करणे हळूहळू सोडून दिले. भडक अत्तराचा वास तिच्या अंगाला येईनासा झाला. केसांना सवंग तेल चोपडायची ती बंद झाली...आणि तिच्याकडे आम्हाला इतर कोणी माणसे आढळेनाशी झाली. तिच्याविषयीच्या आपल्या साऱ्या अपेक्षा पुऱ्या झाल्याचे समाधान शिवाला लाभले.

 एवढे सारे तिने आपखुषीने आमच्याकरिता केल्यानंतर आम्हालाही तिच्याशी वागण्याचे

आम्हां चौघांची बाई । १०१