पान:लाट.pdf/108

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आम्हां चौघांची बाई


 ४२च्या चळवळीत भूमिगत असताना शिवाला आम्ही आमचा पुढारी मानला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली दरोडे घातले होते, विजेच्या तारा तोडल्या होत्या, तुरुंगातून पळालो होतो. खजिने लुटले होते आणि कधी कधी काही बायांचे उंबरठेदेखील झिजवले होते.
 चळवळ संपली. आम्ही उजळमाथ्याने वावरू लागलो आणि इतस्तत: पांगलो गेलो. दैनंदिन सहवासाला मुकलो. अझीम पुन्हा आपल्या भेंडीबाजारातल्या कुणा नातेवाइकाकडे राहू लागला. मी जोगेश्वरीला पळालो.रायबाने लालबागला मुक्काम ठोकला आणि शिवाने समाजवादी पक्षाच्या ऑफिसातच आपले बिस्तर टाकले.
 परंतु या ना त्या निमित्ताने आम्ही एकमेकांना नेहमी भेटू लागलो आणि आमच्या गत आयुष्याच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो. आम्हाला भेटलेल्या त्या असंख्य बायांच्या आठवणीदेखील चघळू लागलो.
 त्या अनेक बायांतील एक काळी बाई तेवढी आमच्या चांगली स्मरणात राहिली होती. तिच्याविषयी शिवा नेहमी आठवणी काढू लागला होता. तिच्याकडे पुन्हा जायचा विचार बोलून दाखवीत होता.
 त्याचा हा विचार आम्हालाही आवडत होता. मोठा आकर्षक वाटत होता. कारण ती बाईच मुळी तशी आकर्षक होती. भरदार अवयवांची आणि बांधेसूद शरीराची होती. तिची त्वचा काळी कुळकुळीत होती. एखाद्या पॉलीश केलेल्या शिसवी लाकडासारखी ती आम्हां साऱ्यांना एकजात भासली होती. आणि मुख्य म्हणजे शिवाची आणि तिची फार चांगली ओळख होती. त्याच्याशी आणि आमच्याशी ती नेहमी फार अदबीने वागत होती. त्यामुळे शिवाने एकदा आपला जायचा विचार बोलून दाखवताच आम्ही साऱ्यांनी तत्काल संमती दिली आणि एक दिवस ठरवून तिच्याकडे गेलो.
 त्या दिवशी पुष्कळ दिवसांनी आलेले पाहताच काळीला बऱ्याच विस्मय वाटला. ती किंचित चपापली. आश्चर्यचकित झाली. अदबशीरपणे नेहमीसारखे तिने आमचे स्वागत केले आणि तिच्या खोलीत बसलेल्या एकदोन लोकांना नजरेच्या इशाऱ्याने पिटाळून लावले.

 त्या दिवशी पुष्कळ दिवसांनी तिच्यात झालेल्या बाह्य बदलाने आम्हालाही स्तंभित केले.

१००