पान:लाट.pdf/107

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खोटं होतं? तिच्या वेदनाच तकलुपी होत्या? तिच्या स्वरातला भावनांचा आवेगच उसना, कृत्रिम होता? आपल्या भावना उघड बोलून न दाखवता तिनं त्यांना खोटं नाटकी रूप दिलं होतं?

 मला काहीच समजेनासं झालं. मी गोंधळलो; भांबावून गेलो. जागच्या जागी थिजून उभा राहिलो. सुमित्रा गोखले आपल्या कृत्रिम भावनाप्रवाहात मला फरपटत कुठं तरी ओढून नेत आहेसं मला वाटू लागलं. तिच्या खोट्या कथेची जाणीव मला गुदमरून टाकू लागली. आणि पाहता पाहता माझ्या मनाची एकदम उलटी क्रिया सुरू झाली. तिच्याविषयी गेले दोन दिवस अकस्मात आलेली सहानुभूतीची लाट तितक्याच गतीनं मागं फिरली; विरून जाऊ लागली. गेले दोन दिवस तिच्याविषयी संचारलेला जिव्हाळाही क्षणार्धात ओसरून जाऊ लागला. गेले दोन दिवस संचारलेला आवेशही एकाएकी संपून गेला. भावना पूर्णपणे थंडावल्या. मन ओकं ओकं झालं. सुमित्रा गोखले मला पुन्हा पहिल्यासारखी परकी वाटू लागली. हाताच्या अंतरावर दोन्ही हातांनी तोंड झाकून बसलेली सुमित्रा गोखले, त्या दिवशी साहित्यसमारंभात दाटीवाटीनं बसलेल्या अनेक श्रोत्यांपैकीच एक वाटू लागली. कोरड्या, शुष्क स्वरात आणि निर्विकारपणे मी तिला म्हणालो, “हे कसं शक्य आहे सुमित्रा? कसं शक्य आहे?"

लाट / ९९