पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते कितपत खरं होतं कोण जाणे, पण प्रज्ञानं कसलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. एक एक क्षण तिच्यासाठी जीवघेणा होता. वहिनीच्या काळजीनं जीव कसनुसा होत होता, तर ट्रकमध्ये इब्राहिमची शारीरिक लगट तिच्या स्त्रीत्वाचे लचके तोडीत होती. तरीही तिला ते निमूटपणे सहन करावं लागत होतं.
 पुन्हा इब्राहिम तिच्याजवळ सरकला. त्याचा राकट हात तिच्या देहाचे वळसे व वळणं शोधू लागला. चाचपू लागला. तसा तिनं प्रतिकार केला, “नको, नको, हे बरं नाही ड्रायव्हरसाहेब...."
 "ये प्यार - मोहब्बत है मेरी जान.. हम दोनों जवान हैं और ऐसा तनहा मौका बार बार नहीं आता!” त्याच्या स्वरातून वासनेची प्रच्छन्न लाळ गळत होती.
 पण तिकडं माझी वहिनी मरणाच्या दारात आहे. प्लीज, माझं मन नाही ड्रायव्हरसाहेब...."
 इब्राहिम काही क्षण तिला आरपार न्याहाळीत राहिला व मग गुरकावीत म्हणाला, "ठीक है, ये ट्रक फिर वापस जायेगा. ऊपर नहीं आयेगा. इसमें इतने फॉल्ट है कि, मैं ही सिर्फ उसे चला सकता हूँ। ये जोखीम मैं सिर्फ तुम्हारी मोहब्बत की खातिर उठाता हूँ, समझी! तुम नहीं चाहती हो तो..."
 “नाही, नाही... माझ्या बोलण्याचा तो मतलब नाही ड्रायव्हरसाहेब...." प्रज्ञा म्हणाली, “मी- मी, मला - मला...”
 ठीक है, कुछ बोलने की जरुरत नहीं है प्यारी...."
 इब्राहिमनं तिची असहायता पुरेपूर ओळखली होती. एक कुंवार स्त्री त्याला विनासायस मिळत होती. केवळ पाण्यासाठी. “वाह रे मालिक, अजीब दस्तूर है। तेरा!”
 पण या रस्त्यावर व यावेळी त्याची अभिलाषा पूर्णपणे पूरी होणं शक्य नव्हतं, तरीही तिच्या शरीराशी त्याला मनसोक्त खेळता आलं. दहा मिनिटे का होईना तिला मिठीत घेऊन तिचा कुंवारा गंध त्याला लुटता आला.
 या दहा मिनिटात एक स्त्री म्हणून ती पुरुषाच्या पशुरूपाच्या दर्शनाने अनेकवार जळून खाक झाली होती. तिच्या मनात एवढा संताप, एवढी अगतिकता दाटून आला होती, की तिला शक्य असतं तर तिनं इब्राहिमचा कोथळा फाडला असता, त्या ट्रकला आग लावली असती आणि मनसोक्त रडली असती. आता इब्राहिमनं तृप्त मनाने चावा फिरवताच ट्रक चालू झाला व दोन तीन मिनिटात तो तांड्यावर आला.

 सारे जण “पाणी आलं - पाणी आलं' म्हणून धावू लागले. पण इब्राहिमन प्रथम तिला पाणी भरून घ्यायला सांगितलं. तिनं क्षणापूर्वीचं सारं विसरून उत्साहान दोन्ही रांजण पाण्यानं भरून घेतले. तो पाईपमधून पडणारा पांढराशुभ्र फेसयुक्त जलौघ पाहून तिचे डोळे व काही प्रमाणात मनही निवून निघालं.

९२ । लक्षदीप