पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाणी भरून होताच ती आपल्या झोपडीकडे धावली आणि दारातच सोजरमावशी गुडघ्यात तोंड खुपसून बसलेली पाहिली... आणि प्रज्ञा थरकापली.... मनात एकाच वेळी अनेक पापशंका चमकून गेल्या.
 "मावशे, मावशे, काय झालं?”
 पोरी....' मान वर करीत थरथरत्या आवाजात सोजरमावशी म्हणाली, “लई येळ झाला. रमाचा ताप तु गेल्यावर वाढतच गेला... आनी तिला वाताचे झटके आले... आनी पोराला जनम देताच तिनं डोळे मिटले..."
 "नाही, नाही.... माझी रमावहिनी मला सोडून जाणार नाही..." बेभानपणे प्रज्ञा म्हणाली.
 ‘पोरी, सुदीवर ये... सम्दं संपलंय गं... म्या लई कोशिश केली... पाणी जर असतं तर रमाची ताप कमी करता आला असता...." सोजरमावशी म्हणाली.
 “बरं, बाळ कसा आहे त्याला पाहायचंय!"
 ‘चल पौरी, त्योबी निपचित पडलाय. जन्मल्यापासून तेचं आंगबी तापलंय बघ." सोजर म्हणाली.
 "एक बादली पानी घे, बाळास्नी आंगूळ घालू... म्हंजे तेची तलखी कमी व्हईल बघ...!"
 ती धावतच गेली. रांजणात बादली बुडवून ती घेऊन आली.
 ते नुकतंच जन्माला आलेलं मूल निपचित पडलं होतं. छातीचा भाग वेगानं वर खाली होत होता. त्याला ते सहन होत नसावं. मधूनच वेदनायुक्त हुंकार तो देत होता. तिनं आपला पदर पाण्यात बुडवला आणि बाळाचे अंग पुसू लागली. तो थंड पदर अंगावरून फिरताना बाळ झटके देत होता.
 तिचं लक्षच नव्हतं. ती बेभानपणे थंड पाण्यानं त्याचं अंग पुसत होती.
 आणि सोजरमावशीनं गळा काढला “थांब पोरी, काईसुदिक उपयोग नाही जाला याचा.. पहा पहा, याचे हात पाय थंड पडत आहेत..."
 “अगं मावशे, मग हे ठीकच आहे की, त्याचा ताप उतरतोय..."
 "नाही पोरी, हे इपरीत वाटतंया..." मावशी म्हणाली, तसं किंचित भानावर येत प्रज्ञानं बाळाकडे पाहिलं. त्याच्या छातीचा वर खाली होणारा भाता बंद पडला होता.. त्याचा हात तिनं हाती घेऊन पाहिला आणि तिच्या हातातून तो निर्जीव बनलेला हात गळून पडला.
 तिचा चेहरा आक्रसून दगडी बनला होता...
 "पोरी, नको तेच झालं बघ, रमाबी गेली आनी बाळबी गेलं गं.." सोजरमावशीचे हुंदकेही घुसमटले होते.

 प्रज्ञा मात्र तशीच निश्चल बसून होती. किती वेळ कुणास ठाऊक!

लक्षदीप । ९३