पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असा हा दुष्काळाचा फटकारलेला आसूड. त्यात दुसरी विहीर खोदताना खडक लागल्यामुळे बोकांडी बसलेलं बँकेचं कर्ज. त्यांनीही ताठर धोरण स्वीकारून जमिनीचा लिलाव पुकारला वसुलीसाठी. स्त्रीधन म्हणून आलेला काळ्या आईचा पाच एकराचा तुकडा बेभाव गेला, तेव्हा गजरा ओक्साबोक्सी रडली होती. पित्याचं मायेचे पांघरूण उडलं जाऊन ती जणू उघडी पडली होती....
 “धनी - या अस्मानी सुलतानीनं भल्या-भल्यांची जिरली, पण तुमचे पाय जमिनीवर कधी आलेच नाहीत. कष्ट करायची, राबायची सवयच नाही तुमास्नी, त्याची लाजबी वाटते... म्हणून मला, डोईवरचा पदर न घसरणाच्या गजराला, ओचा मारून रोजगार हमीच्या कामावर मजूर म्हणून जावं लागलं! घरचा धनी जेव्हा घरट्यातल्या पाखरासाठी घास कमवीत नाही, तेव्हा बाईला आपली मानमर्यादा विसरून पुढे यावं लागतं... यात माझं काय चुकलं?...."
 गजरा आपल्या निर्णयाबद्दल या दुख-या अवस्थेतही ठाम होती. तरीही सवाल होताच... मग हा बोल का? हा आपला बाईपणाचा अपमान का? “हाडहाडं लागत आहेत - पूर्वीसारखी मजा येत नाही...."
 विरलेल्या खणाची चोळी दंडाला सैलावली होती. गुलाबी हात कामानं करपले होते, घट्ट झाले होते. डौलदार बांधाही आक्रसला होता!
 हे.... हे बदललेलं रूप हणमंताला रुचेनासं झालं आहे!
 गजरानं पुन्हा एकदा स्वत:कडे नजर टाकली......
 'होय, मी बदललेय, माझं रूप बदललंय. हाडं चिवट झाली आहेत. शरीरात कष्टाची ताकद ठासून भरली आहे आणि त्याला वाट करून देण्यासाठी म्हणून तकलादू श्रमाची आंच लागताच वितळणारं पोशीव मांस झडत गेलंय एवढंच... या नव्या हाडकलेल्या गजरेचा मला अभिमान वाटतो. ही मीच आहे, पण खुल्या आभाळाखाली मुक्त श्वास घेणारी... रोज दहा ते बारा रुपये कमवणारी एक उत्पादक स्त्री मजूर, कामगार!
 या... या.. सान्याचा मला अभिमान आहे.'
 आपल्याच विचारात नादावलेल्या गजराला भान आलं ते सासूच्या हाकेनं. "सूनबाई, उठलीस की नाही? हा व्यंकू जागा झालाय. दूध मागतोय....”
 लगबगीनं गजरा बाहेर आली आणि दैनंदिन संसाराच्या कष्टाची चक्रे फिरू लागली... घरची सारी कामं आटोपली, तरी हणमंता घोरतच पडला होता. त्याला उठवावं, त्याचं चहापाणी करून द्यावं, असं मनात आलं, पण वेळ नव्हता. आणि त्याच्याकडे पाहताना पुन्हा एकदा एक दुरावा उफाळून आला. एका झटक्यात ती बाहेर पडली आणि लगबगीनं कामाकडे चालू लागली.

 पाझर तलावाचा निम्मा अधिक बांध झाला होता. त्याच्याकडे पाहिलं की,

लक्षदीप । ६१