पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सारी कामे तिलाच पाहावी लागत होती. आणि हे सारं करून दोन किलोमीटरवर चालू असलेल्या रोजगार हमीअंतर्गत पाझर तलावाच्या कामाला तिला साडेआठच्या ठोक्याला हजेरी लावायची होती.....
 पाच वर्षांपूर्वीची गोष्ट. अमाप पिकलेल्या उसामुळे जेव्हा वाड्यात लक्ष्मी प्रसन्नतेनं संचारत होती, तेव्हा हणमंतानं हौसेनं तिला शहरातून घड्याळ आणलं होतं. स्वयंचलित आकड्यांचं. त्याच्या जोरावर ती कामावर वक्तशीर पोहोचत असे. पण त्यामुळे सुरुवाती सुरुवातीला तिची प्रचंड टिंगलही झाली होती. तो हलकट मुकादम तिला फिदीफिदी हसत म्हणायचा, “तालेवाराची बाई तू, घड्याळ लावून कामावर येतेस! कशाला उगीच एका जीवाचा रोजगार बुडवतेस?"
 खानदानी मराठा संस्कारात वाढलेल्या गजराला ते मनस्वी लागायचं. पण परपुरुषाशी फटकन काही बोलावं हा तिचा स्वभावच नव्हता. तेव्हापासून तिनं ते घड्याळ वापरणंच सोडून दिलं होतं! पण घरातून आठ ते आठ पाचला निघायचं, हा तिचा परिपाठ होता, ज्यायोगे ती कामावर वेळेवर पोहोचायची....
 पण रोज सकाळी आठाकडे झुकणारे ते घड्याळाचे काटे पाहिले की,तिला वाटायचं.. हे घड्याळ उचलून फेकून द्यावं.नको ती धावपळ,नको ते कामावर जाणं आणि नको ते उरस्फोडी काम... ज्यामुळे शरीर सुकत चाललेय... मांसलता कमी होत चाललीय...
 "धनी... ते काय बोलून गेलात तुम्ही?" तिच्या मनावर उठलेला हा दुसरा ओरखडा. “जीव कसनुसा झाला वघा. पण तुम्हास्नी काय हो त्याचं?आपलं पाठ फिरवून खुशाल घोरत पडल्यावर कसं कळावं? गरीब ग्रामसेवकाची पोर असले तरी पण माहेर खानदानी आहे धनी,तिथली पण रीत हीच होती.घराबाहेर पडायचं ते देवदर्शनाला किंवा लगीन ... हळदीकुंकवाला,पण हे अस्मानी संकट आलं आणि हे असं विपरीत झालं....”
 भिंतीला लगटून गजरा किंचित ओणवी आपल्याच विचारात होती.मी - मी घराबाहेर पडले ते व्यंकूनं - पोटच्या गोळ्यानं भुकेसाठी रडणं सुरू केलं तेव्हा.घरी दूधच काय, पण भाकरीचा तुकडाही शिल्लक नव्हता.आणि हे, धनी, तुम्हाला सांगून तरी काय उपेग झाला नसता.तुम्ही इनामदारीच्या तोच्यात.निसर्गाची कृपा होती. ऊसशेती होती तेव्हा हा तोरा खपून गेला.पण अतिपाण्यानं जमीन खारावली,फुटली.ऊस पिकेना.आणि मग लागोपाठ तीन वर्षे दुष्काळ.विहीर पण आटली. गतवर्षी जेमतेम हायब्रीड पदरी पडली....

 चांदण्यासारख्या दाणेदार ज्वारीची पांढरीशुभ्र भाकर खाण्यास चटावलेली जीभ हायब्रीडची काळपटलेली जाड भाकरी पाहून रसना पाझरायची विसरली.पण भुकेच्या आगीनं लोचट होऊन ती त्यालाही नंतर सरावली म्हणा!

६० । लक्षदीप