पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गोष्ट रचून सांगणे तिच्या लेखी ‘मस्ट' होतं!आज बंडूच केवळ तिच्या जगण्याचं एकमेव प्रयोजन होतं...
 ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा,त्याचा तिन्ही लोकी झेंडा' हे प्रत्येक मातेचं स्वप्न असतं.अगदी प्रियुसारख्या कुमारी मातेचंही.रघूबरोबर तिने अनेक सिनेमे पाहिले होते.एक तिला कधीही विसरता आला नाही.‘चितचोर'.त्यातला मा. राजू तिला एवढा आवडला होता की ती त्यावेळी रघूच्या कानात पुटपुटली होती, ‘रघू, हा मा. राजू केवढा लोभस व गोंडस आहे.. असं वाटतं,आपला होणारा मुलगा असाच असावा....!”
 एकदा ती शाळेची ट्रिप घेऊन प्रजासत्ताकदिनी नवी दिल्लीला गेली होती.राष्ट्रीय संचलन पाहण्यासाठी. तेव्हा एका खास समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते धाडसी बालवीरांचा सत्कार झाला. तेव्हा तिला आपला होणारा मुलगाही असाच पराक्रमी निघावा असं वाटायचं.
 तिची सर्व स्वप्नं राहून गेली. बंडू फक्त देहधर्माची जाणीव असलेला मांसाचा गोळा होता. त्याची मानसिक वाढ दहा वर्षांपेक्षा कधीही जास्त होऊ शकणार नव्हती!
 म्हणून त्याला रचून गोष्ट सांगताना तिच्या मन:पटलावर आपण पुत्राच्या संदर्भात जी स्वप्नं पाहिली होती ती तिनं एकत्र करून मा. नंदूची व्यक्तिरेखा निर्मिली... आणि ती कथा बंडूला बेहद्द आवडली.
 सहज म्हणून बंडूला तिनं जसं सांगितलं, तसं लिहून काढलं. आळीतल्या मुलांनाही - जे बंडूसोबत खेळायला येत, ते तसेच यावेत म्हणून प्रियू त्यांनाही आवडतील अशा गोष्टी सांगायची. त्यांनाही मा. नंदूची साहसकथा आवडली. मग तो नित्यक्रमच बनला.
 मा. नंदू सर्व मुलांच्या लेखी सत्य एक भावही झाला होता. सर्व मुलं आपसात म्हणायची “दीदी, काय छान गोष्ट सांगतात? बंडू किती भाग्यवान, त्याला अशी छान छान गोष्ट सांगणारी आई मिळाली!"
 ती कडवट हसू हसायची.... बंडूच्या भाग्याला सीमा नव्हती... या वाक्यात केवढा प्रचंड जीवघेणा विरोधाभास दडला होता हे फक्त तीच एकमेव जाणून होती.
 “मी - एक आदर्श माता... माझ्यासारखी प्रेम करणारी आई मिळाली म्हणून बंडू भाग्यवान आहे!"
 अशा समयी ती विलक्षण अवघडल्यासारखी व्हायची - आजची आपली जनमानसातील इमेज हा एक मुखवटा तर नाही - त्या सर्वांना जेव्हा ते कळेल की बंडू बिनलग्नाचा आहे, काय वाटेल? मला आज सर्व जण विधवा समजतात. तो पोटात असताना मी गर्भपात व्हावा म्हणून काय काय औषधं, चाटणं घेतली.

 रघुनं तिला टाकल्यावर प्रेमभंगाच्या व अपेक्षाभंगाच्या दु:खात प्रियू एवढी सुन्न झाली होती की, असली जाणीव तिला स्पर्शतच नव्हती. पुढे काही कालावधीनंतर

४६ । लक्षदीप