पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जेव्हा ती भानावर आली, तेव्हा तिला दिवस टळले होते व दिसामाजी गर्भ वाढत होता.
 ती काचेप्रमाणे तडकून गेली. समाज - चार लोक काय म्हणतील? हा प्रश्न जेव्हा अक्राळविक्राळ स्वरूपात भावी भीषणतेची नांदी वाजवत तिच्यापुढे उभा राहिला, तेव्हा अनिच्छेने व संस्कारशील मनामुळे होणारा सद्सदविवेकबुद्धीला मनातच दडपून गर्भपाताचा निर्णय घेतला.
 गवगवा होऊ नये म्हणून डॉक्टरकडे जायचं सोडून तिनं वळून वैद्याची मदत घेतली. त्याने कसली कडवट चाटणं व मुळ्या औषधी दिल्या होत्या, की त्या घ्यायला अतिशय उष्ण होत्या.
 पण विधात्याला हे बहुधा मंजूर नव्हतं! गर्भानं या उष्ण प्रकृतीची औषधं पचवली. गर्भपात झाला नाही. पण त्याच्या वाढीवर परिणाम मात्र जरूर झाला. ती अपु-या दिवसांची बाळंत झाली.
 आणि तिचा बंडू जन्माला आला तो वाढ थांबलेल्या मेंदूनिशी; शरीराच्या इतर कुठल्याही अवयवांवर दिसण्याजोगा काही परिणाम झाला नव्हता.... पण मेंदूची वाढ खुटली होती.
 डॉक्टरांनी तपशीलवार तपासणीनंतर हे सांगितलं. तेव्हा ती विलक्षण सुन्न झाली...
 “डॉक्टर, मी हे काय केलं? जन्मास येण्यापूर्वी हा मला नको होता, म्हणून कसली औषधं घेतली मी.. पण आता हा या दुनियेत आला आहे. माझ्या रक्त-मांसाचं अंग घेऊन .. तो मला अत्यंत हवा आहे... माझ्या जगण्यासाठी 'मस्ट' आहे. तो बरा नाही का होऊ शकणार?"
 “आय अॅम सॉरी मॅडम् -"
 "आज मी आहे त्याला, तोवर काळजी नाही. पण माझ्या माघारी कसं होईल त्याचं..? शरीरानं वाढवलेला बंडू मूलच आहे हे दुनिया कसं मानेल? त्याचा आईच्या मायेने कोण सांभाळ करील? मी नुसता विचार करते तरी जिवाचा थरकाप होतो. डॉक्टर, मी .. मी काय करू?"
 त्यानंतर प्रियू देवघरात नित्य परमेश्वराची आळवणी करायची - "हे देवा, माझ्या पापाचं, अपराधाचं मी प्रायश्चित्त तर घेतेच आहे. माझे तारुण्य, संसार सगळा त्याग करून केवळ बंडूची आई म्हणून बंडूसाठी जगते आहे. एकच नमन आहे तुझ्या चरणी देवा, की बंडूला माझ्या माघारी ठेवू नकोस. त्याची आबाळ होईल रे-!"

 बंडूचा निरागस, भाबडा व काहीच जाणीव नसलेला चेहरा पाहिला की तिला भडभडून यायचं - मी आई नाही, वैरीण आहे! माझ्या पोराला लवकर मरण येऊ दे • असं अमंगल इच्छिते! कुठे फेडशील ते पाप?

लक्षदीप ॥ ४७